नियमांचा भंग करणाऱ्या पाच दुकानांना ५० हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:13 AM2021-05-10T04:13:43+5:302021-05-10T04:13:43+5:30
चांदूर रेल्वे : शहरात संचारबंदीच्या नियमाचा भंग करणाऱ्या पाच दुकानांवर ५० हजारांची दंडात्मक कारवाई तहसीलदार राजेंद्र इंगळे यांच्या नेतृत्वात ...
चांदूर रेल्वे : शहरात संचारबंदीच्या नियमाचा भंग करणाऱ्या पाच दुकानांवर ५० हजारांची दंडात्मक कारवाई तहसीलदार राजेंद्र इंगळे यांच्या नेतृत्वात स्थानिक महसूल, नगर परिषद व पोलीस विभागाच्या पथकाने रविवारी संयुक्तरीत्या केली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे शहरातील संस्कृती कलेक्शन, भगवान साडी सेंटर, सपना कलेक्शन, खेतान स्टोअर्स व ओम स्टील यांना प्रत्येकी १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
तसेच लाखानी स्टोअर्स यांनी दंड न भरल्याने दुकान सील करण्यात आले. या कारवाईत तहसीलदार राजेंद्र इंगळे, ठाणेदार मगन मेहते, महसूल कर्मचारी अमोल देशमुख, लंगडे, श्रीराम वानखडे, न.प.चे कर्मचारी राहुल इमले, जितेंद्र कर्से, राजेश शिर्के, संजय कर्से, मनीष कनोजे, बंडू वानखडे, पोलीस कर्मचारी जगदीश राठोड, सिद्धोधन उमाळे आदींचा सहभाग होता.
दरम्यान, दूध डेअरींकरिता सकाळी ११ वाजेपर्यंत वेळ देण्यात आला आहे. इतर दुकाने सुरू दिसल्यास व तेथे ग्राहक दिसल्यास दुकानदारांसह ग्राहकांवर ही कारवाई होणार असल्याची माहिती तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी दिली.