फायनान्स कंपन्यांचा वसुलीसाठी शेतकऱ्यांना तगादा
By admin | Published: March 10, 2016 12:29 AM2016-03-10T00:29:19+5:302016-03-10T00:29:19+5:30
तालुक्यात शेतकरी, शेतमजुरांची संख्या अधिक आहे. संत्रा उत्पादकही मोठया संख्येने आहेत. यामुळेच शेकडो बँकांनी तालुक्यात बस्तान मांडले. कर्जपुरवठ्यावरच बँकांची भिस्त आहे.
वरुड तालुक्यात दुष्काळ : कर्जबाजारी शेतकऱ्यांना कोण देणार न्याय?
वरूड : तालुक्यात शेतकरी, शेतमजुरांची संख्या अधिक आहे. संत्रा उत्पादकही मोठया संख्येने आहेत. यामुळेच शेकडो बँकांनी तालुक्यात बस्तान मांडले. कर्जपुरवठ्यावरच बँकांची भिस्त आहे. शहरातील कर्जदाराला कर्ज वाटपानंतर आता उत्पन्नाच्या दृष्टीने ग्रामीण भागात सुध्दा खासगी फायनान्स कंपन्यांनी पाय रोवले आहेत. शेतकऱ्यांना कर्ज देऊन नंतर या कंपन्या वसुलीसाठी सतत तगादा लावत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.
खासगी फायनान्स कंपन्यांनी महिला बचत गट आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना लक्ष्य केले आहे. वसुलीसाठी गुंडांची मदत देखील घेतली जाते. रात्री-बेरात्री कर्जवसुलीसाठी पाठवून कर्जदारांची मानहानी करण्याचे प्रकार घडत आहे. या धास्तीपायी अनेकांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या घटना घडल्या असताना प्रशासन मात्र फायनान्स कंपन्याविरुध्द ‘ब्र’ सुध्दा बोलण्यास तयार नाही. कर्जवसुलीच्या तगाद्यामुळेच आत्महत्या करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे.
तालुका आर्थिकदृष्ट्या सधन असला तरी शेतकरी-शेतमजुरांवर निसर्ग कोपल्याने सततची नापिकी जिवघेणी ठरत आहे. नेमका याचा फायदा घेत तालुक्यात शेकडो बँकांनी बस्तान मांडले. यामध्ये राष्ट्रीयीकृत, सहकारी तसेच खासगी बँकांचा समावेश आहे.
घरबांधणीच्या नावावर शेकडो लोकांना खासगी कंपन्यांनी कर्जवाटप केले. परंतु सततची दुष्काळी परिस्थिती पाहता कर्जदाराकडून कर्ज भरणे शक्य होत नाही. तेव्हा खासगी फायनान्स कंपन्यांनी कर्जवसुलीसाठी दंडुकेशाहीचा वापर सुरु केला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महिला बचत गट, शेतकरी, शेतमजुरांना १० हजार रुपयांपासून तर चार ते पाच लाखांपर्यंत कर्जपुरवठा या खासगी फायनान्स कंपन्यांनी केला. या कंपन्यांकडून मायक्रो फायनान्स अशी नवी शक्कल लढवून बचत गटाच्या माध्यमातून १० हजार ते २० हजारांपर्यंत कर्जपुरवठा केला जातो. यावर १८ ते २० टक्के व्याज आकारणीमुळे मजुरांचे आर्थिक शोषण सुध्दा होत आहे. मुद्दलापेक्षा व्याजाची रक्कम अधिक होत गेल्याने कर्जाची परतफेड करणे शक्य होत नाही. परंतु फायनान्स कंपन्यांचे वसुली अधिकारी धमक्या देऊन वसुलीचा तगादा लावत आहेत. हा प्र्रकार तालुक्यातील गावागावांत सुरु आहे. मागील वर्षी मार्चर् महिन्यात ढोक नावाच्या शेतकऱ्याने एका फायनान्स कंपनीच्या तगाद्यामुळे जीवनयात्रा संपविली होती.
मागील आठवडयात एका शेतकऱ्याने फायनान्स कंपन्यांच्या तगाद्यामुळे विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु संबंधित फायनान्स कंपनीवर कुठलीही कारवाई झाली नाही. प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतली नाही. खासगी फायनान्स कंपनीच्या दंडूकेशाहीविरुध्द ठोस कारवाईची गरज आहे.
अडल्या-नडल्या शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना वेळेवर कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या या खासगी फायनान्स कंपन्या नंतर मात्र अतिशय जाचक पध्दतीने वसुली करीत असल्याने तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. या फायनान्स कंपन्यांवर कुणाचा तरी वचक हवा, याबाबत प्रशासनाने कठोर पाऊले उचलावीत, अशी मागणी तालुक्यातील त्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)