२६ सावकारांवर ‘एफआयआर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 10:11 PM2018-05-31T22:11:11+5:302018-05-31T22:11:11+5:30
जिल्ह्यातील २६ परवानाधारक सावकारांनी परवाना कार्यक्षेत्राबाहेर कर्जवाटप केल्यामुळे संबंधित शेतकरी शासनाच्या सावकारी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील २६ परवानाधारक सावकारांनी परवाना कार्यक्षेत्राबाहेर कर्जवाटप केल्यामुळे संबंधित शेतकरी शासनाच्या सावकारी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिले. महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ४ चे उल्लंघन झाल्याने सहकार आयुक्तांच्या आदेशान्वये संबंधित तालुक्याच्या सहायक निबंधकांनी पोलीस ठाण्यात या विषयीची तक्रार नोंदविली. ही प्रक्रिया गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे या सर्व सावकारांविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहे.
सावकारग्रस्त शेतकरी समितीचे राज्याध्यक्ष अरुण इंगळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात कार्यक्षेत्राबाहेर कर्जवाटप करून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या सावकारांचे परवाने नूतनीकरण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत रिट याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाच्यावतीने या याचिकेचे जनहित याचिकेत रूपांतर करण्यात आले. या विषयाच्या अनुषंगाने सहकार आयुक्तांनी जिल्हा उपनिबंधकास तत्काळ अहवाल मागितला होता.
शासनाने १० एप्रिल २०१४ रोजी शेतकऱ्यांचे सावकारी कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने सावकारी कर्जमाफीची अंमलबजावणी करताना लेखापरीक्षकांनी सावकारांद्वारा सादर केलेल्या यादीची तपासणी केली होती. यामध्ये बऱ्याच सावकारांनी परवाना कार्यक्षेत्राबाहेर कर्जवाटप केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या शेतकऱ्यांना सावकारी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नाही. या सावकारांनी महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम २०१४ चे कलम ४ चे हे सरळसरळ उल्लंघन असल्यामुळे अधिनियमाचे कलम ४१ (ख) व ४८ (क) नुसार गुन्हास पात्र असल्याने या सर्व सावकारांना सात दिवसांच्या आत खुलासा मागितला होता तसेच या सर्व सावकारांचे परवाने रद्द का करण्यात येऊ नये, या विषयीचा प्रस्तावदेखील जिल्हा उपनिबंधकाकडे पाठविला व याच अनुषंगाने संबंधित तालुक्याचे सहायक निबंधकांनी या अधिनियमाचे उल्लंघन करणाऱ्या परवानाधारक सावकारांच्या विरोधात संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यात. त्यामुळे जिल्ह्यातील २६ परवानाधारक सावकारांविरोधात अधिनियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधकांनी दिली.
सर्वाधिक नऊ सावकार तिवसा तालुक्यातील
जिल्ह्यात २६ सावकारांविरोधात एफआयआर नोंदविण्यात आला. यामध्ये सर्वाधिक नऊ सावकार तिवसा तालुक्यातील आहेत. यामध्ये सुनील गोमासे, मुकूंद उदापुरे, विजय मांडळे, कमलाकर विंचूरकर, वसंता अष्टुनकर, ज्ञानेश्वर पाचकवडे, संजय मांडळे, गोपाल हिमाणे व यशवंत वर्मा, तर चांदूरबाजार तालुक्यातील अजय अग्रवाल यांचा समावेश आहे.
अमरावती तालुक्यात किरण विंचूरकर, अभय खोरगडे, सुनील जव्हेरी, रामदास इंगोले, शंकर पंचवटे, अंजनगाव सुर्जी तालुक्यात नितीन लोणकर, भानुदास लोणकर, अतुल दानेज, संंदीप वर्मा, गजेंद्र बैतुले, अचलपूर तालुक्यात विलास काशीकर, गोविंदसा काशीकर, दर्यापूर तालुक्यात सचिन हिरूळकर, रामेश्वर लेंघे, रमेश लोणकर, विकास पाटील यांचा समावेश आहे.
अशी आहे शिक्षेची तरतूद
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे नियम ३९ नुसार जी कोणी व्यक्ती वैध अनुज्ञप्तीशिवाय सावकारीचा व्यवसाय करीत असेल, त्या व्यक्तीला दोष सिद्ध झाल्यानंतर पाच वर्षांपर्यंत असू शकेल एवढ्या कोणत्याही प्रकारच्या कारावासाची किंवा या दोन्ही शिक्षा करण्यात येतील व कलम ४८ (क) अन्वये शिक्षाप्राप्त अपराध हे दखलपात्र अपराध असतील, असे अधिनियमात नमूद आहे.