‘ती’ आग लागली नाही; लावली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 05:00 AM2020-11-22T05:00:00+5:302020-11-22T05:00:33+5:30

सहा अग्निशामक वाहने व शहरातील पाण्याचे टँकर यांच्या साहाय्याने शुक्रवारी तब्बल सहा तासांनंतर आग आटोक्यात आली. तहसील प्रशासनाने ३३ दुकानांचे स्वतंत्र पंचनामे केले. आगीत सर्वस्व गमावलेल्या ३३ दुकानदार व त्यांच्या कुटुंबीयांनी शनिवारी आपआपल्या दुकानात जाऊन काही वाचले का, याची चाचपणी केली. दुकानातील साहित्यासह अन्य सामग्री व महत्त्वाचे दस्तावेज जळाल्याने उभे राहायचे कसे, अशा विवंचनेत शनिवारी दुकानदारांनी जळालेले साहित्य उचलणे सुरू केले.

The fire | ‘ती’ आग लागली नाही; लावली !

‘ती’ आग लागली नाही; लावली !

Next
ठळक मुद्देदुकानदारांचा आरोप : पोलिसांत तक्रार, अग्नितांडवाला वेगळे वळण

  लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : शहरात शुक्रवारी पहाटे ३ च्या सुमारास लागलेल्या आगीत ३३ दुकाने जळून खाक झाली. दुकानदारांचे अंदाजे चार कोटी रुपयांचे नुकसान झाले. ती आग शॉर्ट सर्कीटने नव्हे, तर हेतुपुरस्सर लावल्याची तक्रार स्थानिक पोलिसांत शनिवारी करण्यात आली. तक्रार अर्जाच्या अनुषंगाने पोलिसांनी चौकशी आरंभली आहे. 
सहा अग्निशामक वाहने व शहरातील पाण्याचे टँकर यांच्या साहाय्याने शुक्रवारी तब्बल सहा तासांनंतर आग आटोक्यात आली. तहसील प्रशासनाने ३३ दुकानांचे स्वतंत्र पंचनामे केले. आगीत सर्वस्व गमावलेल्या ३३ दुकानदार व त्यांच्या कुटुंबीयांनी शनिवारी आपआपल्या दुकानात जाऊन काही वाचले का, याची चाचपणी केली. दुकानातील साहित्यासह अन्य सामग्री व महत्त्वाचे दस्तावेज जळाल्याने उभे राहायचे कसे, अशा विवंचनेत शनिवारी दुकानदारांनी जळालेले साहित्य उचलणे सुरू केले. तेथे त्यांना काही संशयास्पद परिस्थिती आढळून आली. परिणामी सर्व पीडित व्यापाऱ्यांनी धारणी पोलीस ठाणे गाठून आग लावणारा शोधून काढून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 
कमाईची राखरांगोळी
शुक्रवारी लागलेल्या आगीत ३३ दुकानदारांचे प्रचंड नुकसान झाले. या सर्वच व्यापाऱ्यांच्या डोळ्यांना अश्रूच्या धारा आहेत. शनिवारी दुकानातील जळालेले साहित्य ते उचलत होते. आता साधनसामग्रीही नाही, अन् दुकानही नाही, नवीन व्यवसाय कसा उभारावा, अशी व्यथा सांत्वनेसाठी येणाऱ्यांकडे मांडत होते. इतक्या वर्षांच्या कमाईची राखरांगोळी झाली असल्याने नवीन व्यवसाय उभारणे शक्यच नसल्याची भावना बहुतांश दुकानदारांनी व्यक्त केली. 

नगरपंचायतकडून मिळाल्या होत्या नोटीस
येथील सर्वे क्रमांक १२६ लगत ही सर्व दुकाने होती. त्यातील काही व्यापाऱ्यांना उपविभागीय अधिकाऱ्यांकडून जागेचे पट्टे मिळाले होते. ते पट्टे अनधिकृत असल्याची ओरड होती. काही दिवसांपूर्वी या दुकानधारकांना कागदपत्रे सादर करण्यासंदर्भात नगरपंचायतने नोटीससुद्धा बजावल्या होत्या. 

शुक्रवारची आग शॉर्ट सर्कीटने  लागली नसून, ती कोणी तरी लावली असल्याचा तक्रार अर्ज व्यापाऱ्यांनी दिला आहे. दोन दिवसांत चौकशी पूर्ण करण्यात येईल. तसे आढळल्यास संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येईल. 
- निकेतन कदम, ठाणेदार, धारणी

Web Title: The fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग