अमरावतीत बाल रुग्णालय परिसरातील मेडिकल स्टोअरला आग; प्राणहानी टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2021 10:49 PM2021-12-28T22:49:29+5:302021-12-28T22:58:06+5:30
Amravati News भूतेश्वर चौकातील हनुमान व्यायाम प्रसारक मार्गावरील ‘अग्रवाल बाल रुग्णालय परिसरातील मेडिकल स्टोअरला रात्री १० वाजताच्या सुमारास भीषण आग लागून हल्लकल्लोळ उडाला.
अमरावती : शहरातील भुतेश्वर चौक परिसरातील एका खासगी बाल रुग्णालयाच्या मेडिकल स्टोअरला मंगळवारी रात्री १० च्या सुमारास भीषण आग लागली. आगीत बाल रुग्ण सापडल्याच्या अफवेने या रुग्णालयापुढे मोठी गर्दी जमली होती. तथापि, कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची बाब पुढे आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, भुतेश्वर चौक परिसरात डॉ. सतीश अग्रवाल यांचे बाल रुग्णालय आहे. त्यामध्ये तिसऱ्या मजल्यावर बालकांच्या आरोग्य रक्षणासाठी एनआयसीयू (नॅनोनॅटल इन्टेन्सिव्ह केअर युनिट) आहे. मंगळवारी रात्री १० च्या सुमारास तळमजल्यावरील मेडिकल स्टोअरला भीषण आगीने वेढले. त्या आगीच्या ज्वाळामुळे धूर थेट तिसऱ्या मजल्यापर्यंत जाऊन पोहोचला होता. त्यामुळे एनआयसीयूमधील दाखल एकमेव नवजाताला तातडीने बाहेर नेण्यात आले. अमरावती महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी आग विझविण्यासाठी पाऊण तास परिश्रम घेतले. त्यासाठी चार ते पाच बंब कामी आले. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता अग्निशमन सूत्रांनी वर्तविली आहे.
दरम्यान, आगीबाबत माहिती होताच खासदार नवनीत राणा या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि घटनेची माहिती घेतली. भंडारा येथील अगिनकांडामुळे नागरिकांमध्ये भीत व्याप्त आहे. त्यामुळे आगीची घटना माहिती होताच त्याबाबत वावड्याही उठल्या. तथापि, या घटनेत जीवितहानी झाली नसल्याचे पुढे आले आहे.