पेट्रोल पंपावर ‘फायर आॅडिट’चा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 10:36 PM2018-04-18T22:36:21+5:302018-04-18T22:37:21+5:30
सूर्य आग ओकू लागला आहे. पारा ४२ ते ४४ अंश सेल्सिअस गाठत आहे. ही स्थिती ज्वलनशील पदार्थांसाठी अतिशय धोकादायक असतानाही शहरातील पेट्रोल पंपांवर ‘फायर आॅडिट’चा धुव्वा उडाल्याचे वास्तव आहे.
गणेश वासनिक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सूर्य आग ओकू लागला आहे. पारा ४२ ते ४४ अंश सेल्सिअस गाठत आहे. ही स्थिती ज्वलनशील पदार्थांसाठी अतिशय धोकादायक असतानाही शहरातील पेट्रोल पंपांवर ‘फायर आॅडिट’चा धुव्वा उडाल्याचे वास्तव आहे. बहुतांश पंपांवरील अग्निशामक यंत्रे कालबाह्य, पर्यायाने निकामी असून, आग लागल्यास प्रसंगी ती नियंत्रणात आणणे अशक्य होईल, असे भयावह चित्र आहे.
पेट्रोल पंपांवर ग्राहकांना आवश्यक सुविधा पडताळणीची जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातच नव्हे, शहरातसुद्धा मोजक्याच पेट्रोल पंपावर या सुविधा आहेत. पेट्रोल पंप हे नियमानुसार सुरू आहेत अथवा नाही, ही खबरदारी घेण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांनी नागपूर येथे विभागीय प्रबंधकांची नियुक्ती केली आहे. त्यांनी महिन्यातून एकदा पंपावर आकस्मिक भेट देऊन ग्राहक संरक्षण कायद्यानुसार सुविधांची तपासणी करणे गरजेचे आहे.
स्वतंत्र पाणी सुविधेचा अभाव
उन्हाळा सुरू झाल्यानंतरही अग्निशामक यंत्रांची दुरुस्ती वा बदलविण्याची तसदी पेट्रोल पंपमालकांनी घेतली नसल्याचे दिसून येते. आग लागल्यास ती रोखणे किंवा विझविण्यासाठी पेट्रोल पंपावर असलेले फायर एक्स्टिंग्यूशर हे कालबाह्य आहेत. या अग्निशामक यंत्रातील गॅस अथवा ड्राय केमिकल मुदतीत बदलविण्यात आलेलेच नाही, असे त्यावरील नोंदीनुसार दिसून येते.
पेट्रोल पंपावर स्वतंत्र पाच ते दहा हजार लिटर क्षमतेचे पाण्याचे टाके निर्माण करणे आवश्यक आहे. मात्र, शहरात एकाही पेट्रोल पंपावर पाण्याचे टाके नाही.
वाळूची झाली माती
पेट्रोल पंपाच्या ठिकाणी आग विझविण्यासाठी लोखंडी बादल्यांमध्ये वाळू भरून ठेवली जाते. मात्र, बहुतांश पंपावर असलेल्या बादल्यांमध्ये वाळूची माती झाली आहे. पेट्रोल पंपमालक हे केवळ व्यावसायिक हित जपत असून, त्यांनी ग्राहकांच्या सुरक्षिततेचे धिंडवडे काढले आहे. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष असून, पेट्रोल पंपावर अप्रिय घटना घडल्यास कोण जबाबदारी स्वीकारणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
महापालिका अग्निशमनने बजावल्या नोटीस
महापालिका अग्निशमन विभागाने पेट्रोल पंप, आरागिरणी, हॉटेल, बीअर बार, ज्वलनशील पदार्थांची विक्री करणाऱ्या प्रतिष्ठानच्या संचालकांना फायर आॅडिटबाबत मार्च महिन्यात नोटीस बजावल्या. मात्र, एकाही पेट्रोल पंप संचालकाने स्वत:हून फायर आॅडिट करून घेतले नसल्याची माहिती आहे. जिल्हा कचेरीची परवानगी अंतिम असल्याच्या अविर्भावात पेट्रोल पंपमालक वागत असून, त्यांना नागरिकांच्या जीविताशी काहीही घेणे-देणे नसल्याचे दिसून येते.
इंधनाची भेसळ, काळाबाजार रोखणे, पिण्याचे पाणी, टॉयलेट, हवा या सुविधांचे उत्तरदायित्व आमचे आहे. पंपावर संरक्षणाची जबाबदारी पेट्रोलियम कंपन्यांची आहे.
- अनिल ताकसांडे
जिल्हा पुरवठा अधिकारी
पेट्रोल पंप संचालकांना फायर आॅडिटसंदर्भात गत महिन्यातच नोटीस बजावली. आतापर्यंत एकाही पंपावर फायर आॅडिट झालेले नाही. उल्लंघनासंदर्भात
पुन्हा नोटीस बजावली जाईल.
- भारतसिंह चौहान
प्रमुख, अग्निशमन विभाग