जुळ्या शहरातील दुकानांचे होणार 'फायर आॅडिट'
By admin | Published: March 21, 2017 12:16 AM2017-03-21T00:16:03+5:302017-03-21T00:16:03+5:30
येथील खासगी जिनिंगला लागलेल्या आगीचे कारण प्रथमदर्शी 'शॉर्टसर्किट' सांगितले जात असताना ...
परवाना रद्द होणार : जिनिंगची आग निष्काळजीपणातून ? दुकानदारांची बेबंदशाही चव्हाट्यावर
परतवाडा : येथील खासगी जिनिंगला लागलेल्या आगीचे कारण प्रथमदर्शी 'शॉर्टसर्किट' सांगितले जात असताना घटनास्थळी प्रत्यक्षात अधिकाऱ्यांना अनियमितता आढळून आल्याची माहिती आहे. त्याच धर्तीवर जुळ्या शहरातील व्यावसायिकांचे 'फायर आॅडिट' करण्याचे आदेश सोमवारी तहसीलदार मनोज लोणारकर यांनी नगरपालिका प्रशासनाला दिल्याने दुकानदारांची बेबंदशाही चव्हाट्यावर आली आहे.
शहरातील एखाद्या प्रतिष्ठानाला आग लागल्यास विझविण्यासाठी अग्निशमन दलास तारेवरची कसरत करून तेथे पोहोचावे लागते. तोपर्यंत बराच अवधी निघून जात असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात अपयश येत असल्याचे चित्र जुळ्या शहरातील आहे. एखाद्या प्रतिष्ठानाला आग लागल्यानंतर इतर दुकानदारांनी त्यापासून धडा न घेता तेसुद्धा दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनात आल्याने आगीच्या घटना रोखण्यासाठी जुळ्या शहरातील व्यापारी प्रतिष्ठानांचे फायर आॅडिट करण्याचे आदेश तहसीलदारांनी नगरपालिका मुख्याधिकारी प्रदीप जगताप यांना दिले.
जिनिंगच्या आगीत अनियमितता रविवारी दुपारी ३.३० वाजता नजीकच्या जवर्डी येथील आर.आर. अग्रवाल यांच्या जिनिंगला लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्याचा ठपका प्रशासनाने ठेवला आहे. तिन्ही कापसाच्या गंज्या विद्युत तारांखाली ठेवण्यात आल्या जोत्या. विद्युत तार झाडांच्या फांद्यांमध्ये अडकले होते. सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असले तरी ते प्रत्यक्षात बंद असल्याचे प्रशासनाला सांगण्यात आले. जिवंत विद्युत तारा रविवारी हवेच्या वेगाने एकमेकांना घर्षण करीत त्यांचीच ठिणगी कापसाच्या गंजीवर पडली किंवा आग कशाने लागली, हे सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याने आगीचे कारण गुलदस्त्यात आहे. आवश्यक त्या बाबी पायदळी तुडविल्याचे चित्र प्रशासनाला घटनास्थळी दिसून आले.
प्रतिष्ठानांची तपासणी
जुळ्या शहरातील व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये आग लागण्याचे कारण कुठले यासंदर्भात सर्वप्रथम त्यांनी सूचनांचे पालन केले किंवा नाही, व्यापारी प्रतिष्ठाने सुरू करताना आवश्यक त्या आगी लागण्याच्या प्रमुख बाबी दुर्लक्षित केल्या का, याची प्रत्यक्ष तपासणी करण्याचे आदेश तहसीलदार मनोज लोणारकर यांनी दिले आहे.
परवाना रद्द करून कारवाई
शासकीय नियमानुसार 'फायर आॅडिट' करताना आढळलेल्या चुकांवर कटाक्षाने कारवाई करण्यात येणार असून, ज्या दुकानदाराने नियमांचे उल्लंघन केले अशांचे व्यापारी परवाने रद्द करण्यात येणार आहे. परिणामी संभाव्य सुरक्षेच्या दृष्टीने सदर कारवाईचे आदेश दिले आहेत.
अशा घटना बहुधा घडल्यात
परतवाडा शहरातील जिनिंग प्रेसिंगला अनेकदा आगी लागण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. इंशुरन्स काढून अशा आगी लावण्यात येत असल्याच्या चर्चेला त्या आगीच्या वेळी पेव फुटले होते. जवर्डीनजीकच्या खासगी औद्योगिकमधील आर.आर. जिनिंगची आग कशाने लागली, यााची तपासणी अचलपूर पोलीस विभाग करीत आहे. घटनास्थळी आढळलेल्या उणिवांवर प्रशासन कुठली कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जुळ्या शहरातील व्यापारी प्रतिष्ठानांचे 'फायर आॅडिट' करण्याचे आदेश नगरपालिकेला दिले आहे. तर जिनिंगच्या आगीची चौकशी करण्याचे पोलिसांना सांगण्यात आले आहे.
- मनोज लोणारकर, तहसीलदार, अचलपूर