पाच ठिकाणी अग्नितांडव
By admin | Published: April 21, 2017 12:17 AM2017-04-21T00:17:08+5:302017-04-21T00:17:08+5:30
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात आज दुपारी पाच ठिकाणी आगीने तांडव घातले. या आगीत दुपारी अडीच वाजताचे सुमारास धर्मापूर येथे
नांदगाव तालुका हादरला : प्रशासनाची आपातकालीन बैठक
नांदगाव खंडेश्वर : नांदगाव खंडेश्वर तालुक्यात आज दुपारी पाच ठिकाणी आगीने तांडव घातले. या आगीत दुपारी अडीच वाजताचे सुमारास धर्मापूर येथे आग लागून १० घरांची राखरांगोळी झाली. तसेच अडगाव बु. येथे आज दुपारी १ वाजता आग लागून २ घरे जळाली. तसेच वाघोडा या गावातील बसस्टँड जवळील गावाला लागूनच असलेल्या गुराच्या गोठ्याला आग लागून कुटारांची गंजी आगीत जळाली. तसेच पिंप्री कलगा या गावाजवळ नागपूर-औरंगाबाद हायवे लगतच्या असलेल्या आजूबाजूच्या जागेवरील गवत व झाडे झुडूपे पेटल्याने काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तसेच दहिगाव येथील कामधेनू संस्थेची कुटाराची गंजी आगीत राख झाली.
धर्मापूर येथे गुरुवारी दुपारी अडीच वाजताचे सुमारास गावाच्या पश्चिमेकडील घराला आग लागून आगीत दादाराव गोविंदराव शिंदे, सुभाष राजाराम शिंदे, संतोष शिंदे, शिवराम शिंदे, मारोती शिंदे, सावळा शिंदे, शंकर शिंदे, अंकूश शिंदे व लहु शिंदे यांची घरे आगीत भस्मसात झाली. यामुळे घरातील तूर, सोयाबीन, चना, गहू व घरातील जीवनावश्यक वस्तूंची आगीत जळून राखरांगोळी झाली. तसेच प्रकाश पाडर यांच्या गुरांच्या गोठ्याला आग लागून कुटार जळाले. लागूनच असलेल्या कोल्हापूर देवीचे मंदिरही आगीत होरपळून निघाले. धर्मापूर व ढवळसर येथील गावकऱ्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करून आग विझविली. यावेळी हवेचा झोत गावाच्या दिशेनेच सुरू होता. पण आग आटोक्यात आल्याने गावातील इतर घरे बाल-बाल बचावली. अडगाव बु। येथे दुपारी १ वाजता आग लागून अमर जोगदंडे व गीता वसंतराव लहाबरे यांची घरे जळून खाक झाली. घटनास्थळी तहसीलदार बी.व्ही. वाहुरवाघ, तलाठी, अग्निशमन दलाची गाडी दाखल झाली होती. शुक्रवारी तहसील कार्यालयात प्रशासनाने आपत्कालीन बैठक बोलावली आहे. (तालुका, शहर प्रतिनिधी)