आगीत तीन दुकाने जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 10:43 PM2018-01-02T22:43:11+5:302018-01-02T22:43:54+5:30
इतवारा बाजार परिसरात सोमवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत तीन व्यापारी प्रतिष्ठाने जळून खाक झाली.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : इतवारा बाजार परिसरात सोमवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत तीन व्यापारी प्रतिष्ठाने जळून खाक झाली. या आगीत एका बकरीचा होरपळून मृत्यू झाला. अग्निशमन दलाने सतत दोन तास पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी हानी टळली. तरीसुद्धा व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
इतवारा बाजारातील काही व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये शॉर्ट सर्कीटने आग लागल्याची माहिती मध्यरात्री १.३५ वाजताच्या सुमारास अग्निशमन विभागाला मिळाली. ट्रान्सपोर्टनगर येथील अग्निशमन उपकेंद्रप्रमुख सैयद अनवर यांच्यासह फायरमन हर्षद दहातोंडे, किशोर शेंडे, सूरज लोणारे, श्रीकांत जवंजाळ, मोहसीन अहेमद व वाहनचालक राऊत, साहीब खान व शेख अमीन यांनी पाण्याचे बंब घेऊन घटनास्थळ गाठले. आग प्रथम अब्दुल कासम अब्दुल गफ्फार यांच्या फर्निचर विक्री प्रतिष्ठानाला लागली. ते जळून खाक झाले व समोर बांधलेल्या बकरीचाही मृत्यू झाला. आगीने अन्य दुकानेही कवेत घेतली. त्यामध्ये नरेश लोहार यांच्या दुकानातील मशिनरी खाक झाल्या. शेजारच्या रशीदभाई यांच्या दुकानातील जुने फर्निचर जळून खाक झाले.