फटाके फोडाच; दिवाळीत ज्ञानदीपही उजळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 11:01 PM2018-11-05T23:01:00+5:302018-11-05T23:01:30+5:30
शाश्वत कन्सेप्ट स्कूलने महापालिकेच्या सहकार्याने यंदाची दिवाळी ज्ञानदीप उजळून करण्यासाठी अभिनव संकल्पना साकारली आहे. दिवाळीच्या फटाक्यांसाठी प्रसिद्ध सायन्स कोअर मैदानातील बाजारपेठेत शाश्वतच्या मुलांनी पुस्तक विक्रीचा स्टॉल थाटला आहे. या पुस्तकविक्रीतून येणारा नफा केरळ पूरग्रस्तांना दिला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शाश्वत कन्सेप्ट स्कूलने महापालिकेच्या सहकार्याने यंदाची दिवाळी ज्ञानदीप उजळून करण्यासाठी अभिनव संकल्पना साकारली आहे. दिवाळीच्या फटाक्यांसाठी प्रसिद्ध सायन्स कोअर मैदानातील बाजारपेठेत शाश्वतच्या मुलांनी पुस्तक विक्रीचा स्टॉल थाटला आहे. या पुस्तकविक्रीतून येणारा नफा केरळ पूरग्रस्तांना दिला जाणार आहे.
दिवाळीत फटाके सर्वांनाच प्रिय. आपआपली क्षमता, कुवतीनुसार त्यावर खर्च केला जातो. मात्र, त्यापासून प्रदूषण होते, हेदेखील तेवढेच सत्य. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत फटाक्यांसोबत पुस्तके खरेदी करून ज्ञानात भर पडावी, अशी अपेक्षा मुलांकडून व्यक्त करण्यात आली. त्याला शाश्वत स्कूलने मूर्त रूप दिले. महापालिकेलाही ही अभिनव संकल्पना पटल्याने सायन्स कोअर मैदानात थाटल्या जाणाऱ्या स्टॉलपैकी दोन स्टॉल शाश्वतला अॅलॉट करण्यात आले. या स्टॉलचे उद्घाटन सोमवारी महापालिका आयुक्त संजय निपाणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. अतूल यादगिरे, अतूल गायगोले, सुनील झोंबाडे, प्रदीप जैन, राणू जैन, मनीष चव्हाण, प्रशांत खापरेकर, मनजीत देशमुख, गणेश वºहाडे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. शाश्वत स्कूलचा चेंज मेकर्स क्लबने पुस्तकविक्रीची जबाबदारी शिरावर घेतली आहे. ज्ञानवर्धक, मनोरंजक, माहितीपर अशी ही पुस्तके छोट्या-मोठ्या सर्वांसाठी आहेत. ७० जणांची ही बालगोपालांची चमू दुपारी १२ ते ६ या वेळेत पुस्तकांची विक्री करीत आहेत. त्याच्या विक्रीतून येणारा नफा हा थेट ‘केरळ रीलीफ फंड’मध्ये जमा केला जाणार आहे. या स्टॉलला सोमवारी सकाळपासूनच फटाके घेण्यासाठी आलेल्या बालगोपालांनी भरभरून भेट दिली. ५ ते ७ नोव्हेंबर दरम्यान हा स्टॉल राहणार आहे.
अद्वैत रोडे, भूमी जैन, प्रणव तोंडरे, पृथा धर्माळे, रणवीर देशमुख, ऋत्विज धर्मे, सलोनी वर्मा, श्रेणिक साकला, तन्मय पाटणकर, वत्सल वारिया, उन्नती राठी, वरुण बजाज यांच्यासह ७० जणांची चेंज मेकर्स टीम या उपक्रमासाठी सज्ज आहेत.
शिवाजी महाराजांचा किल्ला पाहण्यासाठी गर्दी
शाश्वतने नेहरू मैदानातील स्टॉलवर ‘शिवाजी महाराज आजच्या काळात असते तर...’ या संकल्पनेवर आधारित किल्ला साकारला आहे. याशिवाय त्यांचे प्रशासन, खजिना, संरक्षण आदी बाबी आधुनिक काळाचा संदर्भ देऊन प्रदर्शित केल्या आहेत. हा किल्ला पाहताक्षणीच चित्त वेधून घेतो. त्यामुळे या स्टॉलवर गर्दी होत आहे.
एरवी फटाके सर्वांनाच प्रिय. मोठ्यांसोबत फटाके घेण्यासाठी येणारी लहान मुले त्यासाठी हट्ट धरतात. त्यांचा हट्ट मोडून न नेता, फक्त त्यासोबत दोन-चार ज्ञानवर्धक पुस्तके त्यांना वाचनाला देता येतील; वाचनाच्या गोडीने काही तास ते फटाक्यांपासून दूर राहतील, अशी ही साधी संकल्पना आहे.
- आदित्य नागपुरे
चेंज मेकर्स क्लब