हॉटेल ग्रँड महफीलला आग लागल्यानं खळबळ; आग विझवण्यासाठी आलेल्या बंबाला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 10:10 PM2020-02-06T22:10:44+5:302020-02-06T22:10:57+5:30
अग्निशमन दलाच्या बंबाला पार्किंगमध्येच अपघात होऊन चालक गंभीर जखमी
अमरावती : कॅम्पस्थित हॉटेल ग्रँड महफीलच्या सहाव्या मजल्यावरील डक्टिंगला गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता आग लागली. ती विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या बंबाला पार्किंगमध्येच अपघात होऊन चालक गंभीर जखमी झाला. त्यामुळे पेच आणखी वाढला.
टेरेसवर आगीचे लोळ उठत असल्याचे लॉनमध्ये स्वागत समारंभाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांना दिसले. त्यांनी ही माहिती मॅनेजरला दिली. हॉटेलमध्ये नियुक्त फायरमनने पाण्याचा मारा केला. महापलिकेच्या अग्निशमन दलाचे दोन बंबदेखील दाखल झाले; परंतु त्यांचा काहीही फायदा झाला नाही. सिटी कोतवालीचे वरिष्ठ ठाणेदार शिवाजी बचाटे पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पाकगृहात आग लागल्याची व ती धुरांड्यातून वर पोहोचल्याची माहिती बचाटे यांनी दिली. हॉटेलचे संचालक गोपाल मुदंडा यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
अग्निशमन बंबाला अपघात
दरम्यान, अग्निशमन दलाचे एमएच २७ एक्स २०३० क्रमांकाचे वाहन हॉटेलच्या तळाशी असलेल्या पार्किंगमध्ये जात असताना उतरावरून काही फुटांवर असलेल्या हॉटेलच्या मुख्य पाइप लाइन व डक्टिंगला धडकले. यावेळी तेथे कुणी नसल्याने अनर्थ टळला. या अपघातात कंत्राटी चालक संजय चव्हाण हे जबर जखमी झाले. त्यांना वाहनातून काढून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. वाहनाचे ब्रेक फेल झाले की नियंत्रण सुटले, हे स्पष्ट झाले नाही.