मेळघाटात उसळला आगडोंब; पाचशे हेक्टरचे जंगल खाक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2022 06:01 PM2022-04-05T18:01:22+5:302022-04-05T18:02:09+5:30

Amravati Newsमेळघाटातील घटांग, गाविलगड, रायपूर आणि जामली खोंगडा भागात आगडोंब उसळला असून यात सुमारे पाचशे हेक्टरचे जंगल खाक झाल्याची माहिती आहे.

Fire in Melghat; Five hundred hectares of forest ash | मेळघाटात उसळला आगडोंब; पाचशे हेक्टरचे जंगल खाक 

मेळघाटात उसळला आगडोंब; पाचशे हेक्टरचे जंगल खाक 

Next
ठळक मुद्देजामली वन, हरिकेन खोऱ्यासह घटांग, रायपूर क्षेत्रात पाचशे हेक्टर जंगल खाक

नरेंद्र जावरे

अमरावती : मेळघाटातील घटांग, गाविलगड, रायपूर आणि जामली खोंगडा वनपरिक्षेत्रील जंगलात आगडोंब उसळला आहे. सोमवारी रात्री ९ वाजता अंधारातही हरिकेन पॉइंट खोऱ्यातील आगीची धग दुरूनच दिसून येत होती. वनअधिकारी, कर्मचारी, वनमजूर आग विझविण्यासाठी रात्रीपासूनच जंगलात असल्याची माहिती आहे. जवळपास पाचशे हेक्टर जंगल जळाल्याची माहिती आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात अतिसंरक्षित व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलांसह वन विभागाच्या संरक्षित जंगलात आग लागल्याने हजारो हेक्टर जंगल जळून राख होते. संबंधित विभागातर्फे मोठ्या प्रमाणात जनजागृती आणि उपाययोजना केल्यानंतरही आगडोंब थांबलेला नाही. आता व्याघ्र प्रकल्पाच्या परिसराचा विस्तार झाला. अतिसंरक्षित परिक्षेत्रात येणाऱ्या गावांचे पुनर्वसनसुद्धा केले जात आहे. तरीदेखील मेळघाटातील जंगलात आगडोंब उसळत असल्याचे विदारक चित्र पर्यावरणप्रेमींमध्ये चिंतेचा विषय ठरला आहे.

जामली खोंगडा परिक्षेत्रांतर्गत महादेव घसरण परिसर व जामली वनपरिसरातील जंगलातील आग आटोक्यात आणण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी अभय चंदेल व दिनेश वाळके, वनपाल वनरक्षक व मजूर अंगारी यांच्यासह तळ ठोकून असल्याचे सांगण्यात आले. या आगी हेतुपुरस्सर लावण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. पूर्वी बांबूच्या घर्षणाने याआधी आगी लागत असल्याचे सांगितले जात होते; परंतु गेल्या काही वर्षांत मोहफुले वेचण्यासाठी, शिवाय तेंदूपाने जोमाने यावीत, गुरांचा चारा जास्त प्रमाणात उगवावा व बारसिंगाची शिंगे सापडावीत, यासाठी आगी लावण्यात येतात. अनेकदा स्थानिक आरोपी पकडण्यात आले आहेत.

ब्रीदाच्या कोसो दूर समित्या?

संयुक्त वन व्यवस्थापन आणि श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजना अशा दोन वेगवेगळ्या समित्या प्रत्येक आदिवासी गावात कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, आगीपासून जंगलाचे संरक्षण हेच या समित्यांचे ब्रीद आहे. यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च विविध उपक्रम आणि साहित्यासाठी वन आणि व्याघ्र प्रकल्प अंतर्गत केला जातो; परंतु मोबदल्यात आदिवासींची असहकार्याची भूमिका वनसंपदा नष्ट करणारी ठरली आहे. आग विझविण्यासाठी ते पुढे येत नसल्याच्या वास्तवामुळे वन आणि व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी, कर्मचारी हतबल झाले आहेत.

Web Title: Fire in Melghat; Five hundred hectares of forest ash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग