अमरावतीत लॉर्डस हॉटेल पेटविले, मालकाची पोलिसांत तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 09:42 PM2019-12-30T21:42:38+5:302019-12-30T21:42:55+5:30
जुना बायपासवरील एमआयडीसी स्थित हॉटेल लॉर्डसला सोमवारी पहाटे ४.३० वाजता लागलेल्या भीषण आगीत साहित्य जळून खाक झाले.
अमरावती : जुना बायपासवरील एमआयडीसी स्थित हॉटेल लॉर्डसला सोमवारी पहाटे ४.३० वाजता लागलेल्या भीषण आगीत साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल तीन तास श्रम घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान, रात्री ८ च्या सुमारास लॉर्ड्स हॉटेलचे मालक महेश छाबडा यांनी राजापेठ पोलीस ठाणे गाठून तीन तरुणांनी हॉटेल पेटविल्याची तक्रार दिली.
एमआयडीसी स्थित दोन इमारतींचे हॉटेल लॉर्डस हे महेश छाबडा व संजय छाबडा यांच्या मालकीचे आहे. सोमवारी पहाटे ४.४५ वाजता आग लागल्याच्या माहितीवरून अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचला. त्यावेळी तेथील फॅमिली रेस्टॉरेंटमधून आगीचे लोळ निघत होते. अग्निशमनने पाच बंब आणि तीन तास खर्ची घातल्यानंतर आग आटोक्यात आली. या आगीत हॉटेल लॉर्ड्समधील महागडे साहित्य जळून खाक झाले. घटनेच्या अनुषंगाने हॉटेलमालक महेश छाबडा यांनी रात्री राजापेठ पोलिसांत तक्रार नोंदविली. पहाटे ४ वाजता हॉटेलजवळील मार्गावर तीन तरुणांच्या हालचाली संशयास्पद होत्या. ते हल्ला करतील म्हणून मी थेट हॉटेल गाठले. त्यावेळी हॉटेलला आग लागली होती. मागील दार तुटलेले होते. या तरुणांनी हॉटेलला आग लावली; त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी तक्रार महेश छाबडा यांनी पोलिसांत नोंदविली. त्यानुसार रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
तीन जणांनी हॉटेल पेटविल्याची तक्रार मालकाने दिली आहे. त्यानुसार सीसीटीव्हीची पाहणी करू. व्हेरीफाय करून कारवाई केली जाईल.
- किशोर सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक, राजापेठ ठाणे, अमरावती