जलसंपदाच्या यांत्रिकी विभागाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 11:08 PM2018-03-13T23:08:02+5:302018-03-13T23:08:02+5:30
जलसंपदा यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता यांचे कॅम्प स्थित कार्यालयास मंगळवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक झाले.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : जलसंपदा यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता यांचे कॅम्प स्थित कार्यालयास मंगळवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक झाले. शॉर्ट सर्कीटने आग लागल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. कार्यालयातील टेबल, खुर्च्यांसह संगणक जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
पाटबंधारे मंडळाच्या यांत्रिकी विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांचे ऊर्ध्व वर्धा क्वार्टर परिसरात कार्यालय असून, या कार्यालयाची इमारत ३५ वर्षे जुनी आहे. नागपूर येथील कार्यालयाच्या अधिपत्याखाली या यांत्रिकी विभागात धरण, कालवे, तलाव, स्वच्छताविषयक कामकाज चालते. मंगळवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास कार्यालयाला आग लागल्याचे चौकीदार दखणे यांना दिसले. त्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देत अग्निशमनला कळविले. तोपर्यंत ऊर्ध्व वर्धा परिसरातील क्वार्टरमध्ये राहणाऱ्यां नागरिकांनी आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. काही वेळातच अग्निशमन पथकाने घटनास्थळ गाठून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु केले. मात्र, आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे कार्यालयातील आस्थापना, भांडार, लेखा व यांत्रिकी विभागातील बहुतांश भाग जळून खाक झाला होता. घटनेच्या माहितीवरून यांत्रिकी विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेत कार्यालयातील दस्तावेज बाहेर काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही दस्तावेज बचावले.
अग्निशमन दलाच्या सात ते आठ पाण्याच्या बंबांनी तीन ते चार तासांत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. घटनेच्या माहितीवरून जलसंपदाचे नागपूर येथील अधीक्षक अभियंता सी.बी. मढामे, अभियंता अ.ल. राजनेकर, आर.के. ढवळे यांनी कार्यालयाला भेट दिली.
मोरबागच्या आरको गॅरेजला आग
मंगळवारी सकाळी जलसंपदाच्या यांत्रिकी विभागाला आग लागल्यानंतर काही वेळातच मोरबाग येथील आरको गॅरेजला भीषण आग लागली. त्यामुळे अग्निशमन पथकाची चांगलीच ताराबंळ उडाली होती.
आगीत आरको गॅरेजमधील भंगार साहित्य जळून खाक झाले. दाट वस्तीच्या परिसरात असणाºया या गॅरेजची भीषण आग वेळेवर नियंत्रण आल्याने मोठा अनर्थ टळला. अग्निशमन विभागाच्या तीन बंबांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
सिचंन घोटाळ्याशी तार जुळण्याचा संशय
सिंचन घोटाळ्याने राज्यभरात खळबळ माजवली असताना, जलसंपदाच्या यांत्रिकी विभागाला आग लागल्याची बाब संशयास्पद असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सिंचन प्रकल्पातील घोटाळ्याविषयी अमरावती विभागात दोन ठिकाणी गुन्हे दाखल असून, त्याची चौकशी सुरू आहे. या सिंचन प्रकल्पाची उघड चौकशी सुरू असून, या संबंधाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अमरावती विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना संबंधित प्रकल्पांविषयीचे दस्तावेज मागविले आहेत. मात्र, अद्यापपर्यंत ते दस्तावेज एसीबीला प्राप्त झाले नाही. त्यामुळे यांत्रिकी विभागाला लागलेली आग लागली की लावण्यात आली, याबाबत शहरात घमासान चर्चा आहे.