अॅकॅडमिक हायस्कूलच्या कार्यालयाला भीषण आग
By admin | Published: April 19, 2015 12:23 AM2015-04-19T00:23:08+5:302015-04-19T00:23:08+5:30
चांदणी चौक स्थित अॅकॅडमिक हायस्कूलमधील रेकॉर्ड रुमला शुक्रवारी ११.३० वाजताच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत..
चांदणी चौकातील घटना : शिक्षण विभागातील रेकॉर्ड भस्मसात
अमरावती : चांदणी चौक स्थित अॅकॅडमिक हायस्कूलमधील रेकॉर्ड रुमला शुक्रवारी ११.३० वाजताच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत शिक्षण विभागातील कागदपत्रे भस्मसात झालीत. तसेच शाळेच्या ब्रिटिशकालीन इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमक विभागाने तब्बल तीन तास पाण्याच्या मारा करुन आगीवर नियंत्रण मिळविले.
शुक्रवारी रात्रीला अॅकॅडमिक हायस्कुलमध्ये आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली होती. तत्काळ अग्निशमक विभागाचे अधीक्षक भरतसिंह चव्हाण यांच्या नेत्तृत्वात फायरमन अंबाडकर, अजय पंधरे, दिनेश फुन्दे, फैय्याज खान, शारीक अहमद खान, दिलीप चौखंडे, वाहनचालक विजय पंधरे व आपातकालीन विभागाचे ११ कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु केले. पाण्याचे तब्बल १५ बंबांतून पाण्याचा मारा करुन आगीवर नियंत्रण मिळविले. आग लागल्याचे निश्चित कारण कळू शकले नाही, मात्र पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात हायस्कूलच्या आवारात दारुच्या बॉटल व बी.डी. धुटके अस्ताव्यस्त पडल्याचे आढळून आले आहे. तसेच रात्रीच्या वेळेत हायस्कूलच्या आवारात अनेक टवाळखोर परिसरात बसले असतात असे, पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यादिशेने या प्रकरणाचा तपास पोलीस करणार आहे. हायस्कूलची ब्रिटिशकालीन इमारतीमधील सागवानचे सर्व साहित्य जळून खाक झाल्याचे आढळून आले आहे. (प्रतिनिधी)