प्लास्टिक कारखान्याला आग

By Admin | Published: November 13, 2015 12:23 AM2015-11-13T00:23:18+5:302015-11-13T00:23:18+5:30

नजीकच्या नांदगावपेठ एमआयडीसीतील मोहित प्लास्टिक इंडस्ट्रीजला भीषण आग लागून सुमारे ५० लाख रुपयांच्या साहित्याचा कोळसा झाला.

Fire to plastic factory | प्लास्टिक कारखान्याला आग

प्लास्टिक कारखान्याला आग

googlenewsNext

एमआयडीसी येथील घटना : अग्निशमन पथकाची लेटलतिफी
अमरावती : नजीकच्या नांदगावपेठ एमआयडीसीतील मोहित प्लास्टिक इंडस्ट्रीजला भीषण आग लागून सुमारे ५० लाख रुपयांच्या साहित्याचा कोळसा झाला. अग्निशमन दलाचे पथक वेळेवर न पोहोचल्याने नुकसानीत भर पडली. बुधवार ११ नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास लागलेली ही आग ५ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आटोक्यात आली. यासाठी अमरावती, चांदूरबाजार आणि अचलपूर येथून अग्निशमन पथकाला पाचारण करण्यात आले होते.
स्थानिक रामपुरी कॅम्प येथील थावरदास चंद्रमल मेठाणी यांच्या मालकीची एमआयडीसीमधील प्लॉट ‘सी’मध्ये मोहित इंड्रस्टीज नामक प्लास्टिक कारखाना आहे. दीपावली असल्याने थावरमल मेठाणी हेसुध्दा कुटुंबीयांसमवेत कारखान्यात एकत्र आले होते. मेठाणी कुटुंब लक्ष्मीपूजनात व्यस्त असताना आगीचे लोळ उठू लागले. आगीने रौद्ररुप धारण केले. आगीचे बंब पोहोचण्यापूर्वीच कारखान्याचा अर्धाअधिक भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. अमरावती सह चांदूरबाजार आणि अचलपूरहून अग्निशमन बंब मागविण्यात आले.

अन् स्फोट टळला
आग लागली तेव्हा कारखान्याच्या आत भरलेले ४ गॅस सिलिंडर होते. प्रसंगावधान राखून कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी ते सिलिंडर बाहेर काढले. अन्यथा सिलेंडरचा स्फोट होऊन एमआयडीसीमध्ये भीषण अग्निकांड घडले असते.

आगीच्या कारणाविषयी संभ्रम
या आगीत कारखान्यातील मशिनरी, प्लॉस्टिकचे उत्पादन आणि इतर कच्च्या मालाचा अक्षरश: कोळसा झाला. ही आग नेमकी कशाने लागली, याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. आगीने रौद्ररुप धारण केल्याने परिसरात खळबळ उडाली होती. यावेळी बघ्यांची गर्दी झाल्याने आगीच्या नियंत्रणातही व्यत्यय निर्माण झाला होता. दरम्यान पूजेच्यावेळी लावलेला दिवा उंदराने पाडल्याने आग लागल्याचे बोलले जात असले तरी नेमके कारण अद्यापही स्पष्ट न झाल्याने परिसरात विविध चर्चांना उत आला होता.

Web Title: Fire to plastic factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.