उन्हाळा ऋतू ठरतोय वनकर्मचाऱ्यांसाठी "अग्निपरीक्षा"
By admin | Published: April 16, 2017 12:07 AM2017-04-16T00:07:11+5:302017-04-16T00:07:11+5:30
चराईबंदीमुळे काही जनावर पालकांकडून खोडसाळपणाने जंगलात आग लावली जात आहे.
आगीसोबतच उन्हाची दाहकता : वन्यप्राण्यांसह राष्ट्रीय संपत्ती संवर्धनाचा उद्देश
वैभव बाबरेकर अमरावती
चराईबंदीमुळे काही जनावर पालकांकडून खोडसाळपणाने जंगलात आग लावली जात आहे. असे प्रकार उन्हाळ्यातच अनेकदा घडत असल्यामुळे उन्हाळा वनविभागासाठी आव्हानात्मक ठरत आहे. वनसवंर्धनासाठी झटणाऱ्या वनाअधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी उन्हाळा अग्निपरीक्षेसारखाच असून वन्यप्राणी व राष्ट्रीय संपत्तीचे संवर्धन करण्यासाठी अमरावती वनविभाग सातत्याने दिवसरात्र पहारा देत आहे.
उन्हाळ्यातील उष्ण वातावरणात जंगलात अत्यंत भयाण स्थिती राहते. हिरवेगार असणारी वृक्ष कोमेजून जातात. पानगळीमुळे सर्वत्र शुकशुकाट असते. सूर्याचा थेट प्रकाश वनजमिनीवर पडत असल्यामुळे उन्हाळा वन्यप्राणी व वनकर्मचाऱ्यांसाठी सर्वाधिक त्रासदायक ठरतो. जमिनीतील पाण्याची पातळी खालावल्याने वन्यप्राण्यांच्या तृष्णातृप्तीसाठी वनविभागाला सातत्याने लक्ष ठेवावेच लागते. रखरखत्या उन्हात वनाची सुरक्षा सांभाळणाऱ्यांसाठी त्यांना अग्निपरीक्षाच द्यावी लागते. नैसर्गिक पाणवठे आटल्याने वनविभागाने कृत्रिम पाणवठे तयार केलेत. गवत सुकलेले असल्यामुळे वणव्याची भीती आहे. मात्र, त्यापेक्षाही भयंकर स्थिती जंगलात आगी लावल्या जात असल्यामुळे निर्माण झाली आहे. जंगलात वणवा पेटण्याची स्थिती नसल्याचे वनविभागाचे अधिकारी सांगतात. आगी लागण्याचे प्रकार हे खोडसाळपणामुळे होत असल्याचे आढळून आले आहे. जंगलात लागणाऱ्या आगींमुळे राष्ट्रीय संपत्तीचे मोठे नुकसान होऊन वन्यप्राण्यांचा अधिवास धोक्यात येत आहे. त्यामुळे असे प्रकार थांबविण्यासाठी वनकर्मचाऱ्यांना लक्ष द्यावे लागत आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वनकर्मचाऱ्यांना अथक परिश्रम घ्यावे लागते. आगीच्या झळा सहन करीत उपाययोजना करणे भाग पडते. अशा्वेळी भूकतहान हरवून वनकर्मचारी आग विझविण्याचे सातत्याने प्रयत्न करावे लागते. या प्रक्रियेत वनमजुरापासून तर वनसरंक्षकापर्यंतची सर्व यंत्रणा कामी लागली आहे.
आगी लागण्याची कारणे
जिल्ह्यालगतच्या जंगलात सहजासहजी वणवा पेटणे शक्य नसल्याचे वनाधिकारी सांगतात. जंगलात सर्वाधिक आगी नागरिकांच्या खोडसाळपणामुळे लागतात. शेतकरी धुरे जाळतात. अशाप्रसंगी ती आग जंगलापर्यंत पोहचू शकते. जंगलात चराईबंदी ही पशुपालकांच्या जिव्हारी लागते. अशाप्रसंगी वनविभाग कारवाईचा वचपा काढण्यासाठीसुद्धा आगी लावली जाते. वनविभागाच्या कारवाईने दुखावलेले हे इसम जंगलात आगी लावतात. तसेच अनावधानाने अनेकजण जंगलातून जाताना जळती विडी, सिगारेट फेकून देतात. अशाप्रसंगीही आग लागते.
नागरिकांचा खोडसाळपणा, शेतीच्या धुऱ्यावरील आग जगंलापर्यंत पसरते. जळती विडी व सिगारेट जंगलात फेकल्यास आग लाग लागते. यासारखे मुद्दे जंगलात आग लागण्यास कारणीभूत ठरते. सहजासहजी वणवा पेटू शकत नाही.
- राजेंद्र बोंडे,
सहायक उपवनसरंक्षक,