भीषण आगीत चार दुकाने खाक
By admin | Published: February 12, 2017 12:13 AM2017-02-12T00:13:54+5:302017-02-12T00:13:54+5:30
स्थानिक नवी वस्तीतील जयहिंद चौक परिसरात शुक्रवारी मध्यरात्री चार दुकानांना भीषण आग लागली.
बडनेरा येथील घटना : लाखोंचे नुकसान, अग्निशमन विभाग तत्पर
बडनेरा : स्थानिक नवी वस्तीतील जयहिंद चौक परिसरात शुक्रवारी मध्यरात्री चार दुकानांना भीषण आग लागली. यात चारी दुकानांतील माल जळून खाक झाला. त्यामुळे व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. अग्निशमन विभागाने वेळेवर घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला.
बडनेऱ्यातील जहहिंद चौकस्थित रवी अॅन्ड डेली निड्स, रवी जनरल अॅन्ड मोबाईल, फॅशन टेलर्स व न्यू लाईफ टेलर्स ही व्यापारी प्रतिष्ठाने शुक्रवारी मध्यरात्री आगीच्या विळख्यात सापडली. मोबिनपुऱ्यातील रहिवासी मोहनिस खान यांच्या न्यू लाईफ टेलर्स या व्यापारी प्रतिष्ठातून धूर बाहेर येत होता. मात्र, काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण करून चारही दुकानांना कवेत घेतले. ही बाब बडनेरा रेल्वे स्थानकावर तैनात असणाऱ्या एका आरपीएफ जवानाच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ याची माहिती अग्निशमन व पोलीस विभागाला दिली. या माहितीच्या आधारे अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचे बंब घेऊन घटनास्थळ गाठले व आगीवर पाण्याचा मारा करण्यास सुरुवात केली. दरम्यान काही नागरिकांनी दुकानांची दारे उघडून आतील साहित्य वाचविण्याच्या उद्देशाने बाहेर काढण्यास सुरुवात केली. यामध्ये काही प्रमाणात रवि मोबाईल, डेली निड्स व फॅशन टेलर्स या प्रतिष्ठांतून साहित्य बाहेर काढण्यात नागरिकांना यश आले. त्यामुळे त्यांचे काही प्रमाणात नुकसान टाळणे शक्य झाले. रात्री २ वाजताच्या सुमारास लागलेली ही आग पहाटे ५ वाजता अग्निशमन विभागाच्या अथक प्रयत्नाने नियंत्रणात आणणे शक्य झाले. मात्र, या आगीत व्यापारी प्रतिष्ठानातील लाखोंचा मुद्देमाल जळून खाक झाला. त्याचप्रमाणे सिंधी कॅम्प येथील रहिवासी अशोकुमार रोचलानी यांच्या साई आॅनलाईन लॉटरीच्या दुकानातील तीन संगणक जळून खाक झाले, तर महेश धनवानी यांच्या रवि मोबाईल आणि चंदुलाल धनवानी यांच्या डेली निड्स या दुकानातील मुद्देमाल जळून खाक झाला. ही घटना शॉर्ट सर्किटने लागल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या घटनेमुळे बडनेऱ्यात मोठी गर्दी उसळली होती. (शहर प्रतिनिधी)
मोठा अनर्थ टळला
बडनेरा शहरात तीन महिन्यांपूर्वी जयहिंद चौकापासून काही अंतरावर असणाऱ्या शशिकांत कसलचंद यांच्या किराणा दुकानाला आग लागली होती. त्यापूर्वीही अनेक आगीच्या घटना बडनेरात घडल्या आहेत. त्यावेळी बडनेरातील महापालिका कार्यालयात अग्निशमन दलाच्या वाहनांची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली होती. त्यामुळे स्थायी स्वरुपात अग्निशमनची वाहने ठेवण्यात आली. शुक्रवारी मध्यरात्री आगीची माहिती मिळताच तत्काळ मदत मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा या चार दुकानांच्या शेजारीच असलेली १० ते १२ दुकाने आगीच्या विळख्यात सापडली असती.