वरूडमध्ये आग, दोन घरे बेचिराख
By admin | Published: May 18, 2017 12:20 AM2017-05-18T00:20:18+5:302017-05-18T00:20:18+5:30
स्थानिक मिरची प्लॉट परिसरातील झोपडपट्टीला बुधवारी दुपारच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत दोन घरे बेचिराख झाली तर तीन घरांचे नुकसान झाले.
सिलिंडरचाही स्फोट : समयसूचकतेने अनर्थ टळला
लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : स्थानिक मिरची प्लॉट परिसरातील झोपडपट्टीला बुधवारी दुपारच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत दोन घरे बेचिराख झाली तर तीन घरांचे नुकसान झाले. आगीमुळे सिलिंडरचा स्फोट झाल्याने परिस्थिती चिघळणार होती. मात्र, नागरिकांनी समयसूचकता दाखविल्याने मोठी हानी टळली. या आगीत सुमारे दोन लाख २० हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, तहसील कार्यालयानजीक असलेल्या मिरची प्लॉट परसिरात दुपारी दोन वाजताच्या सुमारास एका घराला अचानक आग लागली. ही आग पसरल्याने सूरजलाल सरयाम आणि जमुना मनोज कुमरे यांची घरे देखील पेटली. आगीमध्ये कुमरे यांच्या घरातील सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे वस्तीतील तीन घरांना देखील आगीने वेढल्याने किरकोळ हानी झाली.
घटनेची माहिती मिळताच ठाणेदार गौरव दिवे, तहसीलदार आशिष बिजवल यांनी त्यांच्या पथकासह घटनास्थळ गाठले. वरुड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. वरुड आणि शेंदूरजनाघाट नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. नुकसानग्रस्तांना महसूल विभागाद्वारे पाच हजार रूपये तातडीची मदत देत तात्पुरती राहण्याची व्यवस्था केदारेश्वर विद्यामंदिरमध्ये केली आहे. कुमरे आणि सरयाम यांची प्रचंड हानी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.