दक्षिण वडाळी जंगलात आगीचे तांडव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 01:09 AM2018-04-26T01:09:37+5:302018-04-26T01:09:37+5:30
नजीकच्या वडाळी जंगलात दक्षिण वडाळी आणि जेवड बीटमध्ये बुधवारी दुपारी १२ वाजता अचानक आग लागली. आगीची धग आठ तास कायम होती. सुमारे २० ते २५ हेक्टर जंगल परिसर आगीच्या विळख्यात होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नजीकच्या वडाळी जंगलात दक्षिण वडाळी आणि जेवड बीटमध्ये बुधवारी दुपारी १२ वाजता अचानक आग लागली. आगीची धग आठ तास कायम होती. सुमारे २० ते २५ हेक्टर जंगल परिसर आगीच्या विळख्यात होते. या आगीमागे घातपाताचा संशय असल्याचा अंदाज वनाधिकाºयांनी वर्तविला आहे.
यंदा उन्हाळ्यात वडाळी, पोहरा, चिरोडी जंगलात आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, बुधवारी दक्षिण वडाळी, जेवड बीटमध्ये लागलेली आग ही सहावी घटना असल्याची नोंद करण्यात आली आहे. वडाळी जंगलात वाघ वगळता अन्य वन्यपशू, पक्षांचे वास्तव्य आहे. त्यामुळे वडाळी जंगलात अचानक लागलेल्या भीषण आगीमुळे दुर्मिळ वृक्षांना झळ पोहचली आहे. या आगीत वन्यजीवांचे नुकसान झाल्याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. आगीने तीन ते चार टेकड्यांना वेढले होते. सागवान, वड, पिंपळ, चिंच आदी प्रजातीच्या वृक्षांना आगीने लक्ष्य केल्याचे दिसून आले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी उशिरा रात्रीपर्यंत वनमजुरांना कसरत करावी लागली. ब्लोअरच्या सहाय्याने वनकर्मचाºयांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, जंगलात सुसाट वारा असल्याने आग वाढतच गेली. रात्री ९ वाजपर्यंत वनमजूर जंगलात आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळाली. गुराखी किंवा अवैध वृक्षतोड करणाऱ्यांनी जंगलात आग लावली असावी, असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.
चौकशीअंती पुढे येईल वास्तव
या आगीत किती वन्यजीवांचे मृत्यू झाले, हे चौकशीअंती स्पष्ट होईल. या भीषण आगीत मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, याची वरिष्ठ अधिकाºयांकडून चौकशी झाल्यानंतरच वास्तव पुढे येईल, अशी माहिती एका वनाधिकाºयांनी दिली.