अमरावतीकरांचे नियमांना ‘फटाके’, आकाशात प्रदुषणकारी आतषबाजी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2021 05:00 AM2021-11-06T05:00:00+5:302021-11-06T05:01:01+5:30
दिवाळी आणि फटाके हे समीकरण एकमेकांशी घट्ट असल्याने फटाक्यांशिवाय दिवाळी साजरीच होऊ शकत नाही, हे सत्य असले तरीही प्रदूषणाची समस्या पाहता दिवाळीत फटाक्यांचा अट्टहास नको, यासाठी जिल्हा व पोलीस प्रशासनाकडून स्वतंत्र नियमावली जाहीर करण्यात आली. मात्र, ४ नोव्हेंबर रोजी रात्रभर झालेली आतषबाजी व फुटलेल्या फटाक्यांनी त्याला शहरात तिलांजली मिळाली. फटाक्यांची आतषबाजी वायू व ध्वनी प्रदुषण निर्माण करते. त्याचे विपरीत परिणाम दिवाळीनंतरही अनेक दिवसांपर्यंत दिसून येतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: कोरोनाची दुसरी लाट ओसरली तरीही धोका संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले होते. फटाके उडविण्यासाठी रात्री ८ ते १० अशी मर्यादा देखील आखून देण्यात आली. मात्र, ‘दिवाळसण मोठा, नाही आनंदाला तोटा’ या उक्तीला जागत गुरूवारी कोरोना ओसरल्याच्या आनंदात प्रदुषणकारी फटाक्यांची दिवाळी साजरी करण्यात आली. शहरवासियांनी नियमांना ‘फटाके’ लावले. अख्ख्या रात्रभर प्रदुषणार भर पडली. कारवाई केली ती केवळ पोलिसांनी. बाकी महापालिकेच्या पर्यावरण विभागाला व प्रदूषण नियंत्रण मंडळाला त्याचे काहीही सोयरसुतूक नव्हते.
दिवाळी आणि फटाके हे समीकरण एकमेकांशी घट्ट असल्याने फटाक्यांशिवाय दिवाळी साजरीच होऊ शकत नाही, हे सत्य असले तरीही प्रदूषणाची समस्या पाहता दिवाळीत फटाक्यांचा अट्टहास नको, यासाठी जिल्हा व पोलीस प्रशासनाकडून स्वतंत्र नियमावली जाहीर करण्यात आली. मात्र, ४ नोव्हेंबर रोजी रात्रभर झालेली आतषबाजी व फुटलेल्या फटाक्यांनी त्याला शहरात तिलांजली मिळाली. फटाक्यांची आतषबाजी वायू व ध्वनी प्रदुषण निर्माण करते. त्याचे विपरीत परिणाम दिवाळीनंतरही अनेक दिवसांपर्यंत दिसून येतात. कोरोना आजार झालेल्या किंवा यापूर्वी होऊन गेलेल्या नागरिकांना फटाक्यांच्या धुरामुळे प्रदुषणाचा त्रास होण्याची भीती आहे. हे लक्षात घेऊन नागरिकांनी फटाके फोडण्याचे टाळावे. त्याऐवजी दिव्यांची आरास करून उत्सव साजरा करावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेले आवाहन धनतेरसपासून हवेत विरले.
सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पायदळी
पर्यावरणपूरक दिवाळीसाठी केंद्र सरकारने यंदा ग्रीन फटाके बाजारात आणले आहेत. यामध्ये पेन्सिल, फुलबाजी, सुतळी बॉम्ब, भुईचक्र या फटाक्यांचा समावेश आहे. नेहमीच्या फटाक्यांपेक्षा या फटाक्यांमुळे ३० टक्के कमी प्रदूषण होते. २०१८ मध्ये सुप्रीम कोर्टाने फटाक्यांवर निर्बंध घातले होते. यानंतर या ग्रीन फटाक्यांचा विचार झाला. ग्रीन कॅकर्स वापरावेत, अशी सुचना करण्यात आली. मात्र, दुसरीकडे अमरावती पोलिसांनी शहरातील अनेक ठिकाणी कारवाई करून प्रतिबंधित फटाके जप्त केले. अनेक विक्रेत्यांनी प्रतिबंधित फटाक्यांची दणकून विक्री केली. अशा विक्रेत्यांवर व रात्री १० नंतर आतषबाजी करणाऱ्यांवर नागपुरी गेट, कोतवाली, राजापेठ, फ्रेजरपुरा व गाडगेनगर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे उल्लंघन करून रात्री १० नंतर फटाके फोडताना व प्रतिबंधित फटाके विक्री करणाऱ्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. गुरूवारी रात्री त्यासाठी ‘ऑलआऊट’ मोहिम राबविली. नागरिकांनी विहित वेळेत सामुदायिकरित्या फटाके फोडावेत.
- डॉ. आरती सिंह, पोलीस आयुक्त
- विक्रेत्यांकडूनही नियमांना तिलांजली देण्यात आली. कमी उत्सर्जन करणारे आणि ग्रीन क्रॅकर्स फटाक्यांची विक्री करण्याची परवानगी होती. मात्र प्रतिबंधित फटाके विकले गेले.