मेळघाटच्या जंगलात हवेत गोळीबार, एक कर्मचारी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 05:56 PM2017-12-08T17:56:16+5:302017-12-08T18:03:34+5:30
सागवान तस्करांना पकडण्यासाठी गेलेल्या वनकर्मचा-यांवर दगडफेक करण्यात आली. यात एक वनकर्मचारी जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.
परतवाडा : सागवान तस्करांना पकडण्यासाठी गेलेल्या वनकर्मचा-यांवर दगडफेक करण्यात आली. यात एक वनकर्मचारी जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. प्रत्युत्तरात वनकर्मचा-यांनी हवेत गोळीबार केला. यानंतर वनतस्करांनी पळ काढला.
चिखलदरा तालुक्यातील पूर्व मेळघाट वनविभागाच्या अंजनगाव वनपरिक्षेत्रातील खिरकुंड परिक्षेत्रात सदर प्रकार घडला. वनपरिक्षेत्र अधिकारी ओमप्रकाश पेंदोर, वनकर्मचारी सुरत्ने, सुशांत काळे आदी सागवान तस्करांच्या पाळतीवर होते. तस्करांनी अगदी जवळून सागवान चरपटा वनकर्मचाºयांच्या दिशेने फेकल्या व दगडफेक केली. यात सुरत्ने यांच्या पायाला दगड लागल्याने ते जखमी झाले. दगडफेक रोखण्यासाठी हवेत गोळीबार करण्यात आला. यानंतर तस्करांनी पलायन केले.
१९ होते तस्कर, माल जप्त
खिरकुंडच्या कम्पार्टमेंट क्रमांक १०६४ मध्ये सावरपाणी परिसरात १९ तस्कर होते. प्रत्येकाजवळ एक सागवान चरपट होती. त्या सर्व सोडून पळ काढल्याने वनविभागाने तो माल जप्त केला आहे.
अंजनगाव, भंडारजला जाते सागवान-
अंजनगाव तालुक्याला लागून चिखलदरा तालुक्यातील वनक्षेत्र आहे. सावरपाणी परिसरातील सागवान तस्कर मोठ्या प्रमाणात वृक्षकटाई करून भंडारज येथील महेंद्र दिप्टे याच्याकडे अंजगाव येथे विक्री करीत असल्याचे झालेल्या कारवाईत उघडकीस आले आहे. या कारवाया वनविभागाऐवजी अमरावतीच्या स्थानिक गुन्हे शाखेने केल्या होत्या. त्यानंतर वनविभागाची झोप उघडली होती. अंजनगाव परिक्षेत्रातील सागवानची परतवाडा परिक्षेत्रांतर्गत विक्री केली जात असताना सीमारेषेने वनाधिकाºयांना बंधने घातल्याचे सत्य आहे.
खिरकुंड परिसरात बुधवारी सायंकाळी सागवान तस्करांनी दगडफेक केली. प्रत्युत्तरादाखल हवेत एक राऊंड फैरी झाडण्यात आल्या. सागवान चरपटा जप्त करण्यात आल्या आहेत.
ओमप्रकाश पेंदोर, वनपरिक्षेत्र अधिकारी, अंजनगाव सुर्जी