उत्साहात वाजली पहिली घंटा
By admin | Published: June 28, 2017 12:12 AM2017-06-28T00:12:06+5:302017-06-28T00:12:06+5:30
दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्या संपल्या आणि मंगळवारी शाळा पुन्हा गजबजल्या. नवीन दप्तर, गणवेश, नवी कोरी पुस्तकांच्या ओढीने उत्साहात विद्यार्थी शाळेत आलेत.
शाळा गजबजल्या : रॅली, दिंडी, मिष्ठान्न वाटपासह नवागतांचा प्रवेशोत्सव
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्या संपल्या आणि मंगळवारी शाळा पुन्हा गजबजल्या. नवीन दप्तर, गणवेश, नवी कोरी पुस्तकांच्या ओढीने उत्साहात विद्यार्थी शाळेत आलेत. शासनाद्वारे विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा केला जात असल्याने विद्यार्थ्यांच्या उत्साहाला अधिक आनंदाची किनार लाभली आहे. या आनंदातच मंगळवारी शाळेची पहिली घंटा वाजली.
काही अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठपुस्तक ांचे वाटपही करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवसाचा आनंद व्दिगुणित करण्यासाठी सकाळपासून पालकांची साथ होती.
शहरासह ग्रामीण भागातील विविध शाळांमध्ये उत्साहवर्धक वातावरण होते. पालकांसह शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व स्थानिक लोकप्रतिनिधींनी गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चॉकलेट वितरित करण्यात आलेत.
विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे मोफत वितरण
अमरावती : सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागासह पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. सकाळी ८ वाजता काही ठिकाणी दिंड्या, पालखी मिरवणूक, दुचाकी रॅलीदेखील काढण्यात आली. बचत गट, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालकांच्या उपस्थितीत जनजागृती फेऱ्यादेखील काढण्यात आल्यात. शहरात प्रभागातील नगरसेवक, तर ग्रामीण भागात ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच पंचायत समिती, जिल्हा परिषद पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीसुद्धा नवागतांचे स्वागत केले.
शासकीय व खासगी शाळेत इयत्ता पहिली ते सातवीच्या मुलींना मोफत पाठपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
मंगलमय वातावरण
पाना-फुलांनी सजविलेल्या शाळा, जागोजागी रेखाटलेल्या रांगोळ्या, अशा प्रसन्न व मंगलमय वातावरणात मंगळवारी नव्या शैक्षणिक सत्राला सुरूवात झाली. जिल्हा परिषद, महापालिका व खासगी शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पालकांचा उत्साह देखील पाहण्यासारखा होता. सकाळपासून पाल्यांना शाळेत पोहोचविण्याची लगबग दिसून आली. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात शाळेचा पहिला दिवस आनंददायी ठरल्याचे चित्र शाळांमध्ये होते.
लोकप्रतिनिधींचा उत्साहवर्धक सहभाग
जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांची पहिली घंटा मंगळवार २७ जून रोजी वाजली. शिक्षण विभागाने प्रवेशोत्सवाची जय्यत तयारी केली होती. विद्यार्थी व त्यांच्यापालकांचे स्वागत करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, शिक्षण सभापती जयंत देशमुख, आरोग्य सभापती बळवंत वानखडे, डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे,शिक्षणाधिकारी एस.एम पानझाडे, सी.आर. राठोड आदींसह सर्व खातेप्रमुख आवर्जुन उपस्थित होते. याशिवाय अंगणवाडी केंद्रातही चिमुकल्यांच्या प्रवेशानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.