मेळघाटात पहिले पक्षी सर्वेक्षण; २१० प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 04:12 PM2023-01-31T16:12:36+5:302023-01-31T16:13:25+5:30
दहा राज्यांतील पक्षी अभ्यासकांचा सहभाग
अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पात करण्यात आलेल्या पहिल्या पक्षी सर्वेक्षणात पक्ष्यांच्या २१० प्रजातींची नोंद घेण्यात आली. त्यात मेळघाटात आढळणाऱ्या पक्ष्यांच्या यादीत नव्याने १० प्रजातींची भर पडली. २६ ते २९ जानेवारीदरम्यान झालेल्या या मोहिमेत महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा, प. बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ व जम्मू आणि काश्मीर आदी १० राज्यांतील एकूण ६० पक्षी अभ्यासक सहभागी झाले होते, हे विशेष.
अकोट वन्यजीव विभागातील शहानूर येथून सर्वेक्षणाचा शुभारंभ झाला. प्रत्येकी दोन निरीक्षक याप्रमाणे ३० पथके मेळघाटातील चार विभागात विविध ठिकाणी रवाना झाली. यापूर्वी नोंद झालेल्या २९४ पक्षी प्रजातीपैकी सुमारे २१३ प्रजातींचे पक्षी नोंदविण्यात आले आहेत. या अभ्यासातून या पक्ष्यांची संख्या व काही पक्षी प्रजातींची सद्य:स्थिती (Status) कळण्यास मदत होणार आहे. सर्वेक्षणात मेळघाटच्या यादीत यापूर्वी समाविष्ट नसलेले सुमारे १० प्रजातींचे पक्षी प्रथमत:च नोंदविण्यात आले. त्यामुळे मेळघाटातील पक्ष्यांची यादी तीनशेवर पोहोचली आहे. प्रकल्पाच्या क्षेत्र संचालक ज्योती बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनात आणि मेळवाटच्या गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक सुमंत सोळंके, सिपना वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षक दिव्या भारती व अकोट वन्यजीव विभागाच्या सहा. वनसंरक्षक आर्या यांच्या सहकार्याने मोहीम पार पडली.
प्रथमच आढळले हे पक्षी
मेळघाटात प्रथमच नोंदविण्यात आलेल्या पक्ष्यांमध्ये हिमालयीन रुबीथ्रोट, गुलाबी गोमेट, लांब शेपटीचा गोमेट, काश्मिरी माशीमार, सोनेरी डोक्याचा वटवट्या, रेषाळ गळ्याचा सुतार, मोठा राखी खाटीक व काळ्या पंखाचा कोकीळ खाटीक हे काही दुर्मीळ पक्षी, तसेच शेंडी बदक व तरंग बदक यासारखे स्थलांतरित पाणपक्षी नोंदविण्यात आले आहेत. मेळघाटमधून २० वर्षांपूर्वी पुनर्वसन झालेल्या कुंड या ठिकाणी पक्षी अभ्यासक श्री. मिलिंद सावदेकर व सामिष डोंगळे यांना गुलाबी गोमेट, लांब शेपटीचा गोमेट, काश्मिरी माशीमार हे तीन पक्षी आढळून आले. हिमालयीन रुबीथ्रोट या सुंदर पक्ष्याची नोंद ले. क. रोहित शर्मा यांनी वान अभयारण्यातील बारुखेडा या ठिकाणी घेतली.