उन्नत भारत अभियानाचे अमरावती विद्यापीठात पहिले केंद्र
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 06:11 PM2019-11-11T18:11:26+5:302019-11-11T18:11:36+5:30
विदर्भातील विद्यापीठे, संस्था एकत्रित येणार; शिक्षणातील सामाजिक चळवळ उभारणार
अमरावती : केंद्र सरकारच्या उन्नत भारत अभियानाचे देशातील पहिले विभागीय समन्वयक संस्था (आयसीआय) म्हणून संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठात केंद्र मंजूर झाले आहे. या केंद्राच्या माध्यमातून विदर्भातील विद्यापीठे, सामाजिक संस्था एकत्रित येऊन शिक्षणातील सामाजिक चळवळ उभी करणार आहे. या केंद्राचे उद्घाटन २० नोव्हेंबर रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते होणार आहे.
भारत सरकारच्या मानव विकास मंत्रालयाकडून ‘आरसीआय’ हे केंद्र अमरावती विद्यापीठाला प्राप्त झाल्याने ते नोडल म्हणून कामकाज हाताळणार आहेत. विदर्भातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी हे केंद्र कार्यरत असेल. शहराचा विकास झाला, त्या तुलनेत ग्रामविकास व्हावा. शिक्षण आणि समाज या एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. समाजाच्या विकासासाठी शिक्षणाचा मोलाचा वाटा आहे.
विद्यापीठ हे शिक्षण देणारे ज्ञानकेंद्र असून, या माध्यमातून समाज शिक्षित करण्याचे कार्य अविरतपणे सुरू आहे. या ‘थीम’वर आधारित उन्नत भारत अभियान आणि उन्नत महाराष्ट्र अभियान योजनेने ग्रामीण भागातील अनंत अडचणी सोडविण्यासाठी ‘अॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. कृषी क्षेत्राला बळकटी, कर्जबळीमुळे शेतकरी आत्महत्या रोखणे, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, शेतीपूरक पशुपालन, मत्स्य व्यवसाय, गोपालन, कुकुटपालन, वनौषधी आदींवर स्वंयरोजगाराला चालना दिली जाणार आहे.
विदर्भातून या विद्यापीठाचा सहभाग
उन्नत भारत अभियानाच्या माध्यमातून ग्रामविकासासाठी विदर्भातील सर्वच विद्यापीठे एकित्रत आली आहेत. यात अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठ, नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर येथील व्ही.एन.आय.टी. विद्यापीठाचा सहभाग असणार आहे.
उन्नत भारत केंद्रातून शिक्षणातून ग्रामविकास, कॉलेज टू व्हिलेज, ग्राम दत्तक योजना राबविली जाणार आहे. शिक्षणाला सामाजिक चळवळ बनविण्यासाठी अविरतपणे कार्य के ले जाणार आहे. ग्रामविकास हीच स्वप्नपूर्ती असणार आहे असं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांनी सांगितले आहे.