पहिलीचा वर्ग कुलुपबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 09:45 PM2018-09-13T21:45:01+5:302018-09-13T21:46:12+5:30
विद्यार्थ्यांअभावी पहिलीचा वर्गच बंद असल्याचा धक्कादायक प्रकार महापालिकेच्या रामनगर शाळेत उघड झाला आहे. परिसरातील बहुतांश मुले खासगी शाळांकडे गेल्याने हा पेचप्रसंग उद्भवला आहे. महापालिका शाळांना लागलेली उतरती कळा या प्रकारातून अधोरेखित झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विद्यार्थ्यांअभावी पहिलीचा वर्गच बंद असल्याचा धक्कादायक प्रकार महापालिकेच्या रामनगर शाळेत उघड झाला आहे. परिसरातील बहुतांश मुले खासगी शाळांकडे गेल्याने हा पेचप्रसंग उद्भवला आहे. महापालिका शाळांना लागलेली उतरती कळा या प्रकारातून अधोरेखित झाली आहे. भौतिक सुविधा व शिक्षणाचा खालावलेला दर्जाही त्यास कारणीभूत असल्याची प्रतिक्रिया यानिमित्ताने उमटली आहे. महापालिका शाळांमधून मोफत पाठ्यपुस्तक, मोफत गणवेश, ई-लर्निंगसारख्या सुविधा पुरविल्या जात असताना, विद्यार्थ्यांची एकेरी पटसंख्या चिंतेची बाब बनली आहे.
अमरावती महापालिकेकडून ६७ शाळा संचालित केल्या जातात. मराठी, हिंदी आणि उर्दू माध्यमातील या शाळांमध्ये १० हजारांहून अधिक विद्यार्थी आहेत. मात्र, महापालिका शाळांचा दिवसेंदिवस खालावत चाललेला दर्जा व खासगी शाळांच्या तुलनेत भौतिक सुविधांच्या अभावाने पटसंख्या रोडावत चालली आहे. ज्या परिसरात खासगी शाळा अधिक आहेत, त्या ठिकाणच्या महापालिका शाळांना विद्यार्थी मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर बालाजी प्लॉटलगत असलेल्या रामनगर येथील शाळेत पहिलीत एकही प्रवेश नसल्याची बाब धक्कादायक आहे. इयत्ता पहिली ते पाचवीचे वर्ग या शाळेत भरतात. दुसरी ते पाचवी या चार वर्गात एकूण २६ विद्यार्थी आहेत. त्यापैकी २० ते २३ जण हजर राहत असल्याची माहिती तेथील शिक्षकांनी दिली. या दुमजली शाळेत खाली आणि पहिल्या मजल्यावर वर्ग भरतात. ही दोन शिक्षकी शाळा अदमासे १९४० ते १९५० च्या कालावधीतील आहे. उन्हाळ्याच्या शाळेत पहिलीच्या प्रवेशासाठी आम्हीही फिरलो; मात्र खासगी शाळांचे शिक्षकही बाहेर पडल्याने आम्हाला मुले मिळाली नसल्याची माहिती सहायक शिक्षकांनी दिली. पहिलीचे विद्यार्थी मिळावेत, यासाठी रामनगर शाळेत यंदापासून सेमी इंग्रजी माध्यमाची नर्सरी सुरू करण्यात आली, हे विशेष. उर्वरित चार वर्गातील विद्यार्थी दोन वर्गात एकत्रित करुन येथील दोन शिक्षिका त्यांना ज्ञानदान करतात. गतवर्षी पहिलीत पाच विद्यार्थी होते.
शिक्षणाधिकारी अनभिज्ञ
महापालिकेच्या रामनगर स्थित शाळेत पहिलीत एकही विद्यार्थी नसल्याच्या प्रकारापासून शिक्षणाधिकारी अनिल कोल्हे अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. कोल्हे यांच्या नियुक्तीने महापालिकेच्या शिक्षण विभागाला बऱ्याच वर्षानंतर प्रतिनियुक्तीचा अधिकारी मिळाला. त्यांना महापालिका शाळांमधील एकूण पटसंख्या सांगण्यात आली. मात्र, रामनगर शाळेत पहिलीत एकही विद्यार्थी नसल्याची वस्तुस्थिती त्यांच्यापासून दडविण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
महापालिका शाळांमधील एकूण वर्गनिहाय पटसंख्या शिक्षण विभागाकडे उपलब्ध आहे. मात्र रामनगर शाळेमध्ये पहिलीत एकही विद्यार्थी नाही, याबाबत मला माहिती नाही. माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- अनिल कोल्हे, शिक्षणाधिकारी, महापालिका
रामनगर, बालाजी प्लॉट परिसरात अनेक खासगी शाळा आहेत. पहिलीत विद्यार्थी नसल्याची वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. पहिलीत प्रवेश मिळावेत, यासाठी रामनगर शाळेत नर्सरी सुरु केली. त्यासाठी सामाजिक संस्था सहकार्य करत आहे.
- प्रणित सोनी, उपसभापती, शिक्षण समिती