१८ हजार ‘फ्रंट लाईन’ वर्कर्सना सर्वप्रथम कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 05:00 AM2020-10-29T05:00:00+5:302020-10-29T05:00:23+5:30
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधक लसीसाठी सर्वत्र अहमहिका सुरू आहे. जी कोणतीही लस पहिल्यांदा उपलब्ध होईल, त्याची पूर्वतयारी जोरदार सुरू आहे. याच अनुषंगाने आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी सोमवारी दुपारी जिल्हा प्रशासनाचा व्हीसीद्वारे आढावा घेतला. यादरम्यान त्यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेत शासकीय व खासगी स्तरावरील ‘फ्रंट लाईन वर्कर्स’ची माहिती ३१ ऑक्टोबरच्या आत मागितली आहे.
गजानन मोहोड
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना संसर्गाशी सर्वांत पुढच्या फळीत लढणाऱ्या आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम कोरोनाची लस मिळणार आहे. या ‘फ्रंट लाईन वर्कर्स’चा डेटा तयार करण्यात येत आहे. जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेच्या शासकीय व खासगी अशा एकूण १८ हजार कर्मचाऱ्यांची माहिती ३१ तारखेच्या आत शासनाला पाठविण्यात येणार आहे.
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधक लसीसाठी सर्वत्र अहमहिका सुरू आहे. जी कोणतीही लस पहिल्यांदा उपलब्ध होईल, त्याची पूर्वतयारी जोरदार सुरू आहे. याच अनुषंगाने आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी सोमवारी दुपारी जिल्हा प्रशासनाचा व्हीसीद्वारे आढावा घेतला. यादरम्यान त्यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेत शासकीय व खासगी स्तरावरील ‘फ्रंट लाईन वर्कर्स’ची माहिती ३१ ऑक्टोबरच्या आत मागितली आहे. या अनुषंगाने महापालिका, जिल्हा परिषद व जिल्हा आरोग्य यंत्रणा कामी लागली असून, अधिनस्थ यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी तसेच आयएमए व तत्सम संघटनेशी संलग्न यंत्रतेतील सर्व व्यक्तींच्या माहिती संकलन करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू झाले आहे. त्याचप्रमाणे लशींचा साठा ठेवण्यासाठी कोल्ड स्टोअरेज, लसीकरण करण्यासाठीचे केंद्र आदी तयारी या निमित्ताने सुरू झाली आहे. राज्याचे आरोग्य विभागाद्वारे २३ ऑक्टोबर सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांना पत्र देऊन या मोहिमेची माहिती व महत्त्व विशद केले आहे. प्रत्येक जिल्ह्याची काय तयारी सुरू आहे, यासाठी प्रधान सचिवांनी व्हीसीद्वारे आढावादेखील घेतला.
यांचा पहिल्या मोहिमेत समावेश
एएनएम, एमपीडब्लू, आशा, आशा पर्यवेक्षक, स्टाफ नर्स, हेल्थ सुपरव्हायझर व सुपरव्हायझर, आयुष, अलोपॅथी डॉक्टर्स, डेंटिस्ट, मेडिकल, नर्सिंग, पॅरामेडिकल आणि इतर विद्यार्थी, फार्मासिस्ट, फिजिओथेरपी, रेडिओलॉजिस्ट, टेक्निशियन, आरोग्य यंत्रणेतील ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक, सफाई कामगार, क्लरिकल व प्रशासकीय स्टाफ यांची वर्गवारी करण्यात येऊन त्यांच्या सविस्तर माहिती त्यामध्ये भरण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
प्रतिबंधासाठी ‘लाईव्ह अटेन्यूएटेड व्हॅक्सीन’
कोरोना प्रतिबंधासाठी जी लस उपलब्ध होणार आहे, ती ‘लाईव्ह अटेन्युएटेड व्हॅक्सीन (जिवंत लस) या प्रकारातील असल्याचे सांगण्यात आले. ती कोठून उपलब्ध होणार, याविषयी आरोग्य विभाग अनभिज्ञ आहे. कोरोनावरील लस भारतात २०२१ च्या सुरुवातीला उपलब्ध होणार असल्याचे सुतोवाच केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी यापूर्वीच केलेले आहे. भारतात दोन लशींच्या मानवी चाचण्या सुरू झालेल्या आहेत, तर रशियानिर्मित लशीच्या चाचण्यादेखील देशात लवकरच सुरू होतील.