पहिल्याच दिवशी ‘सीएस’ने केले शवविच्छेदन
By admin | Published: July 5, 2014 12:26 AM2014-07-05T00:26:42+5:302014-07-05T00:26:42+5:30
जिल्हा सामान्य रूग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक पदाची धुरा शुक्रवारी सांभाळल्यानंतर ...
अमरावती : जिल्हा सामान्य रूग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक पदाची धुरा शुक्रवारी सांभाळल्यानंतर अरूण राऊत यांनी पहिल्याच दिवशी शवविच्छेदन केल्याने हा सामान्य रूग्णालय परिसरात चर्चेचा विषय ठरला होता.
रुजूू होण्याच्या पहिल्याच दिवशी शवविच्छेदनगृहात जाऊन शवविच्छेदन करणारे ते पहिले अधिकारी आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ येणाऱ्या रुग्णांना तत्पर आरोग्य सेवा प्रदान करण्याचे उद्दिष्ट घेऊन ते पदावर रुजू झाले आहेत. त्यांच्या कार्यकाळात रुग्णालयीन व्यवस्था सुधारण्याची चिन्हे दिसून येत असल्याच्या प्रतिक्रिया कर्मचारी व रूग्णांमध्ये उमटत आहेत.
गेल्या काही वर्षांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयातील गैरसोईमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रूग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यास रुग्णालयीन व्यवस्था तोकडी पडत आहे. तसेच अस्वच्छता, सीटी स्कॅन मशिन बंद व कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा अशा एक ना अनेक समस्या आहेत. रघुनाथ भोये यांच्या जागी रुजू झालेल्या अरूण राऊत यांच्यापुढे अनेक आव्हाने आहेत.
यापूर्वी नांदेड जिल्ह्यातील गोकुंदा येथे उपजिल्हा रुग्णालयात त्यांनी वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यभार सांभाळला आहे. गुरुवारी सायंकाळी त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा शल्य चिकीत्सक पदाची धुरा हाती घेतली. शुक्रवारी सकाळपासूनच त्यांनी आपल्या कामाची तत्परता दाखविली. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपामुळे अरुण राऊत यांनी स्वत: मृतदेहाचे शवविच्छेदन केले.