जीएसटीचा पहिला दिवस संभ्रमाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2017 12:06 AM2017-07-02T00:06:15+5:302017-07-02T00:06:15+5:30
एक राष्ट्र -एक कर-एक बाजार ही संकल्पना घेऊन १ जुलैपासून कार्यान्वित झालेल्या वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीचा पहिला दिवस संभम्राचा राहिला.
व्यवसायावर परिणाम : विभागीय आयुक्तालयात सुविधा कार्यालय
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : एक राष्ट्र -एक कर-एक बाजार ही संकल्पना घेऊन १ जुलैपासून कार्यान्वित झालेल्या वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीचा पहिला दिवस संभम्राचा राहिला. या करप्रणालीबाबत पुरेसी जनजागृती न झाल्याने बहुतांश व्यावसायिकांमध्ये संभ्रमावस्था पाहावयास मिळाली. जीएसटी लागू होताच अनेक आस्थापनांतील ‘सेल’संपुष्टात आलेत. बाजारपेठेत संमिश्र प्रतिक्रिया अनुभवायला मिळाली.
जीएसटीला विरोध करण्यासाठी शुक्रवारी अमरावतीच्या कापड व्यापाऱ्यांनी बंद पाळला होता.मात्र शनिवारी ही बाजारपेठ यथावत सुरू होती. शहरातील तीन मोठे मॉल्स दुपारी १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले. "सिस्टिम अपडेट" न झाल्याने शहरातील अनेक आस्थापना दुपारपर्यंत बंद होत्या. बहुतांश वस्तूंवर भिन्न प्रकारचा जीएसटीने बड्या किराणा आस्थापना धारकांची तांत्रिक गोची झाली.
कुठल्या वस्तूंवर नेमका किती टक्के जीएसटी आकारायचा, त्याबाबत पुरेशी माहिती नसल्याने अनेक बड्या किराणा आस्थांंपनामधून संगणकीय ऐवजी हस्तलिखित देयक देण्यात आलीत. सुवर्णकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. आधी सोन्यावर १.२ टक्के कर होता. जीएसटीमध्ये तो ३ टक्क्यांवर स्थिरावला. ग्राहकांना हा बदल समजून सांगताना सराफा व्यावसायिकांची तारांबळ उडाली. जीएसटी लागू होण्यापूर्वी मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स आणि रेडिमेड व्यावसायिकांनी ग्राहकांना ३० ते ५० टक्के सवलत दिली होती. त्यामुळे गेली तीन- चार दिवस बाजारपेठ ग्राहकांनी फुलली होती. मात्र शनिवारी अनेक आस्थापना दुपारपर्यंत बंद राहिल्याने ग्राहक बाजारपेठेकडे फिरकले नाहीत. वेगवेगळ्या वस्तूंवर भिन्न प्रकारचा कर लागत असल्याने ग्राहकांमध्येही संभ्रम राहिला. त्यामुळे बाजारपेठ स्थिरावल्यानंतर खरेदीसाठी बाहेर पडण्यावर अमरावतीकर नागरिकांनी भर दिला. काही ठिकाणी वादाचे प्रसंगही उद्भवले. ग्राहक आणि व्यावसायिकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. दरम्यान येथील विभागीय आयुक्त कार्यालयात वस्तू व सेवा कर कार्यालयाचे शनिवारी उद्घाटन करण्यात आले. जुने विक्र ीकर भवनाचे नाव बदलून त्याला जीएसटी कार्यालय, असे नवे नामानिधान मिळाले आहे.
जीएसटी प्रणाली सर्वांसाठी सुविधाजनक आहे. काही ठिकाणी भीतीपोटी, तर कुठे अफवांमुळे विरोध होत आहे. वर्षभरात या कर प्रणालीचे सुपरिणाम दिसतील. सर्व कर एकत्र झाल्याने जीएसटी प्रणाली क्लिष्ट भासतेय. मात्र, प्रत्यक्षात जीएसटीने करात सुसूत्रता आणली आहे.
- किरण पातुरकर, अध्यक्ष,
एमआयडीसी असोशिएशन
जीएसटीबाबत ग्राहकांना समजावून सांगताना अडचणी आल्यात. व्यवसायावर फारसा परिणाम जाणवला नाही. आता सोन्यावर ३ टक्के जीएसटी आकारला जातोय.
- बागडे ज्वेलर्स,
जयस्तंभ चौक, अमरावती
ग्राहकांच्या तुलनेत व्यापारी आणि व्यावसायिकांमध्ये जीएसटीबाबत संभ्रम आहे. दुपारी १२ वाजताच्या सुमारास सराफा बाजारातील सोन्याच्या दुकानात गेले असता "सिस्टिम अपडेट" झाली नसल्याचे सांगत दुपारी येण्याची सूचना करण्यात आली.
- शीतल चौधरी, गृहिणी, अमरावती
निर्णय चांगला आहे. मात्र नियोजनासाठी पुरेसा अवधी न दिल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. सिस्टिम अपडेट केल्यानंतर व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला नसता. जीएसटीने करप्रणालीत सुसूत्रता येईल.
- सुरेश जैन, अध्यक्ष,महानगर चेंबर