अमरावती विभागातील तीन जिल्ह्यांमध्ये दुष्काळाचा प्रथम ट्रिगर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:39 PM2017-10-24T12:39:50+5:302017-10-24T12:48:38+5:30
आता शासनस्तरावर दुष्काळ जाहीर करण्याचे परिमाण व परिभाषा बदलली आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यांत सरासरीपेक्षा ७५ टक्के पाऊस कमी असल्याने अमरावती, यवतमाळ व वाशीम जिल्ह्यात दुष्काळाचा प्रथम ट्रिगर लागू होण्याची शक्यता आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : आता शासनस्तरावर दुष्काळ जाहीर करण्याचे परिमाण व परिभाषा बदलली आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यांत सरासरीपेक्षा ७५ टक्के पाऊस कमी असल्याने अमरावती, यवतमाळ व वाशीम जिल्ह्यात दुष्काळाचा प्रथम ट्रिगर लागू होण्याची शक्यता आहे. संबंधित जिल्ह्यातील दुष्काळ देखरेख समितीद्वारा कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समितीला दर आठवड्याला अहवाल व पाठपुरावा करावा लागणार आहे.
शासन जाहीर करीत असलेली खरिपाची हंगामी, सुधारित व अंतिम पैसेवारी आणि कमी उत्पन्नावर दुष्काळ जाहीर करण्याची पद्धत यामध्ये आता बदल करण्यात आला आहे. केंद्र शासनाने दुष्काळ व्यवस्थापन संहिता २००९ मध्ये सुधारणा करून आता सुधारित दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ जाहीर केली आहे. यामध्ये शास्त्रीय निकष व सुधारित कार्यपद्धती विशद केली आहे. ही पद्धत या वर्षापासून राज्यानेही स्वीकारली आहे. दुष्काळी परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी प्रामुख्याने पर्जन्यमान, वनस्पती निर्देशांक, मृदा आर्द्रता निर्देशांक, जलविषयक निर्देशांक व पिकांचे क्षेत्रीय सर्वेक्षण, सत्यापन विचारात घेऊन समित्यांचे गठण करण्यात आले आहे. यामध्ये पर्जन्यमानाशी निगडित निर्देशांक हा पहिलाच घटक आहे. यानंतर प्रभावदर्शक निर्देशांक यामध्ये वनस्पतीशी निगडित निर्देशांक, सामान्य फरक आर्द्रता निर्देशांक, वनस्पती स्थिती निर्देशांक, लागवडीखालील क्षेत्र, मृदा आर्द्रता निर्देशांक तसेच जलविषयक निर्देशांक यामध्ये भूजल पातळी निर्देशांकाचा समावेश आहे. एकंदर दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रियाच शासनाने क्लिष्ट केली आहे. यानंतर तीन टप्प्यांमध्ये दुष्काळाची तपासणी केली जाणार आहे. एवढ्यावरच ही प्रक्रिया संपत नाही, तर यानंतर दुष्काळी स्थितीवर नियंत्रण ठेवून त्याचे मूल्यांकन करण्यासाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय व जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समिती मॉनिटरिंंग करणार आहे.
असा आहे पर्जन्यमानाशी निगडित निर्देशांक
दुष्काळासंदर्भात हा अनिवार्य निर्देशांक आहे. यामध्ये पर्जन्यमानाचे विचलन, पर्जन्यमानातील खंड तसेच जून व जुलै महिन्यात एकूण सरासरी पर्जन्याच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस असल्यास व जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी पर्जन्यमान ७५ टक्कयांपेक्षा कमी असल्यास दुष्काळाची प्रथम कळ लागू होणार आहे. पर्जन्यमानाच्या नोंदी तालुकानिहाय घेण्यात येतील. विभागातील अमरावती जिल्ह्यात सरासरीच्या ६७.३ टक्के, यवतमाळ जिल्ह्यात ६२ व वाशीम जिल्ह्यात ७२.९ टक्के पावसाची नोंद असल्याने या जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रथम ट्रिगर लागू होण्याची शक्यता आहे.