भाजपची पहिली यादी जाहीर; धामणगाव प्रताप अडसड, अचलपुरातून प्रवीण तायडे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 12:15 PM2024-10-21T12:15:54+5:302024-10-21T12:20:53+5:30

Amravati : अमरावतीत भाजपच्या वाट्याला जागा किती?; इच्छुक अन् पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम

First list of BJP announced; Praveen Taide from Dhamangaon Pratap Adsad, Achalpur | भाजपची पहिली यादी जाहीर; धामणगाव प्रताप अडसड, अचलपुरातून प्रवीण तायडे

First list of BJP announced; Praveen Taide from Dhamangaon Pratap Adsad, Achalpur

लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती :
राज्यात २० नोव्हेंबर रोजी विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. त्याअनुषंगाने भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीने रविवारी राज्यातील ९९ मतदारसंघांतून उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात अमरावती जिल्ह्यातून धामणगाव रेल्वे प्रताप अडसड, तर अचलपुरातून प्रवीण तायडे या दोघांची नावे आहेत. त्यानिमित्ताने भाजपने आमदार प्रताप अडसड यांच्यावर धामणगावातून पुन्हा विश्वास टाकला आहे, तर अचलपुरातून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तायडे यांच्या रूपाने नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. 


अमरावती जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ असून, भाजपने आठही मतदारसंघांतून तयारी चालविली आहे. मात्र, रविवारी जाहीर झालेल्या उमेदवाऱ्यांच्या यादीत केवळ दोनच नावे असल्याने जिल्ह्यातील भाजपत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अचलपूर, धामणगाव रेल्वेसह तिवसा, मेळघाट, दर्यापूर, मोर्शी व अमरावती या हक्काच्या जागा भाजपला हव्या होत्या. तशी मागणी वरिष्ठांकडे अमरावती जिल्ह्यातील नेत्यांनी केली होती; परंतु ९९ उमेदवारांच्या यादीत केवळ दोन नावे जाहीर झाल्याने उमेदवारीच्या प्रतीक्षेत असलेल्या भाजपच्या इच्छुकांना 'जोर का झटका धीरे से' मानला जात आहे भाजपच्या वाट्याला येणाऱ्या परंपरागत तिवसा आणि मेळघाट या दोन मतदारसंघांतून भाजपने पहिल्या यादीत उमेदवार जाहीर न केल्यामुळे 'कुछ तो गडबड है' असे बोलले जात आहे. त्यामुळे इच्छूक उमेदवार व त्यांचे पाठीराखे संभ्रमात आहेत.


' चार मतदारसंघांतून मतदान, पुढे काय? 
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने अचलपूर, धामणगाव रेल्वे, मेळघाट, दर्यापूर या चार मतदारसंघांतून उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी मोजक्याच पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. प्रदेश भाजपने विधनासभानिहाय मतदार यादीदेखील पाठविली होती. यात थेट निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. निरीक्षकही नेमले होते. मात्र, रविवारी भाजपने उमेदवारांची नावे जाहीर करताना तिवसा, मेळघाटचा समावेश दिसून आला नाही. त्यामुळे भाजपने उमेदवारांबाबत निवडणूक प्रक्रिया राबविली ते वास्तव जाणून घेण्यासाठी की केवळ खानापूर्ती होती, असा सवाल उपस्थित होत आहे.


महायुतीतून 'त्या' जागा मित्रपक्षाकडेच... 
महायुतीने जागा वाटपाच्या ठरविलेल्या फॉर्म्युलानुसार शिंदेसेना, अजित पवार राष्ट्रवादीला नेमक्या किती जागा मिळतील, हे भाजपच्या यादीने स्पष्ट केले आहे. अमरावती, मोर्शी मतदारसंघ अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार असल्याचे संकेत आहेत, तर दर्यापूर, मेळघाट या दोन मतदारसंघावर शिंदेसेनेने दावा केला आहे. बडनेरा मतदारसंघ हा युवा स्वाभिमान पार्टीला सोडला जाणार असे निश्चित झाले आहे. तिवसा मतदारसंघातील उमेदवारीसाठी भाजपाअंतर्गत रस्सीखेच सुरू असून, मेळघाट विधानसभा मतदारसंघाविषयी अद्यापही तोडगा निघालेला नाही.

Web Title: First list of BJP announced; Praveen Taide from Dhamangaon Pratap Adsad, Achalpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.