आरटीईच्या ३,०७० जागांसाठी पहिली सोडत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 10:42 PM2018-03-12T22:42:11+5:302018-03-12T22:42:11+5:30
शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रियेंतर्गत आॅनलाईन अर्जाची दुसऱ्या टप्प्यातील सोडत १२ मार्चला एकूण ३ हजार ०७० जागासाठी सोडत काढण्यात आली आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रियेंतर्गत आॅनलाईन अर्जाची दुसऱ्या टप्प्यातील सोडत १२ मार्चला एकूण ३ हजार ०७० जागासाठी सोडत काढण्यात आली आहे. यात ७ हजार ०८१ अर्जांची सोडत काढण्यात आली आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने आरटीई प्रवेशासाठीची पहिली सोडत सोमवारी झेडपीचे शिक्षण व बांधकाम सभापती जयंत देशमुख, प्राथमिक शिक्षणाधिकारी आर.डी. तुरणकर, उपशिक्षणाधिकारी जयश्री राऊत, विस्तार अधिकारी किशोर पुरी, प्रिती गावंडे आदींच्या उपस्थितीत पार पडली. या सोडतीत नेमके किती प्रवेश निश्चित होतील, हे मात्र १३ मार्च रोजीच स्पष्ट होणार आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई)साठी जिल्ह्यात ३ हजार ७० जागांसाठी तब्बल ११ हजार ०९ अर्ज आॅनलाईन प्राप्त झाले होते. त्यापैकी ३ हजार ९२८ पालकांनकडून निश्चित केले नाही. त्यामुळे ७ हजार ०८१ अर्जच आरटीईसाठी निश्चित करण्यात आले. यासर्व अर्जासाठी ही सोडत काढली आहे. शिक्षण विभागाकडे आरटीई प्रवेशासाठी एकूण २३३ शाळांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २७ शाळा नर्सरीच्या २१० जागासाठी आहेत. उर्वरित २८६० जागा इयत्ता पहिलीसाठी आहेत. भातकुली पंचायत समितीच्या सभागृहात पार पडलेल्या आरटीई सोडतीची प्रक्रिया तीन प्लेटांमध्ये चिठ्ठया टाकूण काढण्यात आली. यावेळी केजीवनचा विद्यार्थी प्रणव आनंद भैसारे व अथर्व दीपक गावंडे या चिमुकल्याच्या हाताने चिठ्ठ्या काढूृन सोडतीची प्रक्रिया शिक्षण विभागाने पूर्ण केली आहे.
सर्व प्रक्रिया आॅनलाईन असून ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत अशा सर्व पालकांना सोडतीची माहिती पालकांना एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १४ ते २४ मार्चपर्यंत प्रवेशाची संधी मिळालेल्या शाळेत जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेशासाठी एकापेक्षा अधिक शाळांमध्ये जागा मिळालेल्या पाल्यांच्या पालकांनी पसंतीच्या कोणत्याही एकाच शाळेत प्रवेश घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिली आहे. यावेळी पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.