राज्याचे पहिले मराठी विद्यापीठ रिद्धपूर येथे व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:27 AM2021-09-02T04:27:35+5:302021-09-02T04:27:35+5:30

अमरावती येथील साहित्यिकांची मागणी, मुख्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांकडे साकडे अमरावती : राज्याचे पहिले नियोजित मराठी विद्यापीठ अमरावती जिल्ह्यातील ...

The first Marathi University of the state should be at Ridhpur | राज्याचे पहिले मराठी विद्यापीठ रिद्धपूर येथे व्हावे

राज्याचे पहिले मराठी विद्यापीठ रिद्धपूर येथे व्हावे

Next

अमरावती येथील साहित्यिकांची मागणी, मुख्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांकडे साकडे

अमरावती : राज्याचे पहिले नियोजित मराठी विद्यापीठ अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे व्हावे, अशी मागणी साहित्यिक नरेशचंद्र काठाेळे यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली आहे.

राज्य सरकारने मराठी विद्यापीठाच्या स्थापनेला अनुकूल कौल दिला आहे. हे नियोजित मराठी विद्यापीठ महानुभावपंथीयांची काशी असलेल्या व मराठीतील आद्यग्रंथ लिहिल्या गेलेल्या अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजारजवळील रिद्धपूर येथे व्हावे, अशी मागणी अमरावतीकर साहित्यिक, साहित्य संगम बहुजन साहित्य परिषदेचे संस्थापक नरेशचंद्र काठोळे यांनी केली आहे.

रिद्धपूर येथील वेगवेगळ्या मठात हजारो ग्रंथ आज उपलब्ध आहेत. या हस्तलिखितांचे जतन व्हावे, ही खरोखर काळाची गरज असून त्यासाठी तत्कालीन कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी पाठपुरावा केला. मराठीमधील सुरुवातीचे सर्व ग्रंथ हे महानुभाव पंथ यांच्या लेखकांनी लिहिले आहे, याबद्दल शंका नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी मराठीतील पहिले ग्रंथ लिहिले गेलेत आणि तत्कालीन व त्यानंतरच्या काळातील हस्तलिखिते जिथे आजही उपलब्ध आहेत, त्याच ठिकाणी हे नियोजित विद्यापीठ व्हावे, अशी मागणी नरेशचंद्र काठोळे यांनी केली आहे.

------------------

तंजावर संस्थान ग्रंथालयाच्या देखभालीसाठी आयएएस अधिकारी

तमिळनाडूतील तंजावर येथील जगप्रसिद्ध सरस्वती वाचनालयाला भेट देऊन तेथील दुर्मीळ हस्तलिखितांची व ग्रंथांची काठोळे यांनी नुकतीच पाहणी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे भोसले यांचे तंजावर हे संस्थान असून, त्या ठिकाणी या ग्रंथालयाच्या देखभालीसाठी दोन आयएएस अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. तेथील ग्रंथालयाच्या दालनात असलेल्या हस्तलिखितांची जपवणूक करण्यासाठी दोन आयएएस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

---------------

झाडीबोली नाट्य चळवळीकडे दुर्लक्ष

अमरावतीसह विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये मराठी भाषेतील अनमोल खजिना दडलेला आहे. परंतु, शासन किंवा प्रस्थापित संस्थांतर्फे त्याची दखल घेण्यात आली नाही. चंद्रपूर-गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत चालणारी झाडीबोली नाट्यचळवळ आहे. रात्रभर चालणाऱ्या झाडीबोली नाटकांकडे मात्र पद्धतशीरपणे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे वास्तव आहे.

Web Title: The first Marathi University of the state should be at Ridhpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.