सुपर रुग्णालयात पहिली न्यूरो सर्जरी यशस्वी; महिलेला मिळाले जीवनदान
By उज्वल भालेकर | Published: April 26, 2023 07:32 PM2023-04-26T19:32:11+5:302023-04-26T19:32:24+5:30
हा वर्षांपासून डोक्याला होती गाठ
अमरावती : शहरातील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे पहिली न्यूरो सर्जरी (मेंदूची शस्त्रक्रिया) यशस्वी झाली असून, ३० वर्षीय महिलेला जीवनदान मिळाले आहे. तीन तास चाललेल्या शस्त्रक्रियेमध्ये डॉक्टरांनी १५ सेंटिमीटर लांब तर तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम वजनी गाठ काढली. मागील दहा वर्षांपासून या महिलेच्या डोक्यामध्ये ही गाठ होती.
शहरातील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय हे जिल्ह्यासह अमरावती विभागातील विविध रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. या ठिकाणी मंगळवार दि. २५ एप्रिल रोजी पहिली न्यूरो सर्जरी करण्यात आली. जिल्ह्यातील मोगरा येथील ३० वर्षीय महिलेच्या डोक्याला तब्बल दहा वर्षांपासून गाठ होती. ही गाठ दिवसेंदिवस वाढत होती. त्यामुळे सदर महिलेने अनेक खासगी रुग्णालयांमध्ये उपचार केले; परंतु तिला आराम मिळाला नाही. अखेर गाठीच्या वाढत्या त्रासामुळे ती ११ एप्रिल रोजी सुपरमध्ये उपचारासाठी दाखल झाली होती. यावेळी येथील न्यूरो सर्जनने तपासणीनंतर शस्त्रक्रिया करून गाठ काढण्याचा निर्णय घेतला. तब्बल तीन तास चाललेल्या या शस्त्रक्रियेमध्ये डॉक्टरांनी तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम वजन असलेली गाठ काढली असून, ही गाठ लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवली आहे. ही शस्त्रक्रिया महात्मा जोतिबी फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत नि:शुल्क केल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
या डॉक्टरांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया
न्यूरो सर्जरी ही सुपरचे वैद्यकीय अधीक्षक वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूरो सर्जन डॉ. स्वरूप गांधी, डॉ. अभिजित बेले, डॉ. योगेश सावदेकर, डॉ. तक्षक देशमुख (प्लास्टिक सर्जन), बधिरीकरणतज्ज्ञ डॉ. रोहित हातगावकर, डॉ. रवी भूषण, डॉ. अभिजित दिवेकर, डॉ. नीलेश पाचबुधे, डॉ. अंजू दामोदर यांनी यशस्वी केली. त्याचबरोबर अधिसेविका चंदा खोडके, परिचारिका दीपाली देशमुख, संध्या काळे, तेजल बोडगे, सरला राऊत, सुजाता इंगळे, भारती घुसे, प्राजक्ता देशमुख, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेमधील डॉ. पायल रोकडे, डॉ. दिव्यानी मुंदाने, समाजसेवा अधीक्षक शीतल बोंडे, औषध विभागाचे हेमंत बनसोड, संतोष शिंदे याचेही विशेष सहकार्य लाभले आहे.
सदर महिला ही ११ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल झाली होती. दहा वर्षांपासून तिच्या डोक्यावर गाठ होती. त्यामुळे तपासणीनंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयातील ही पहिलीच न्यूरो सर्जरी होती. जवळपास तीनशे ते साडेतीनशे ग्रॅमची ही गाठ आहे. ही गाठ पुढील तपासणीसाठी लॅबला पाठविली आहे. -डॉ. मगेश मेंढे, विशेष कार्य अधिकारी, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"