मुंगी कोळीच्या नराची देशातील पहिली नोंद मेळघाटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 11:14 AM2021-05-08T11:14:06+5:302021-05-08T11:14:26+5:30
Amravati news मुंगी कोळीच्या नराची देशातील पहिली नोंद मेळघाटात घेण्यात आली आहे. दर्यापूरचे प्राध्यापक डॉक्टर अतुल बोडखे व त्यांच्या सहकाऱ्यांनी 2019 मध्ये पहिल्यांदा मेळघाटात या मुंगी कोळीच्या नराला शोधून काढले होते.
अनिल कडू
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: मुंगी कोळीच्या नराची देशातील पहिली नोंद मेळघाटात घेण्यात आली आहे. दर्यापूरचे प्राध्यापक डॉक्टर अतुल बोडखे व त्यांच्या सहकाऱ्यांनी 2019 मध्ये पहिल्यांदा मेळघाटात या मुंगी कोळीच्या नराला शोधून काढले होते.
मेळघाट व्याघ्र अभयारण्य, रंगूबेली तापी परिसर, धारखोरा धबधबा परिसर व घटांगच्या पुढील नबाब नाला परिसरात हा कोळी (स्पायडर ) त्यांना आढळून आला.
यानंतर 2021 मध्ये प्राधिकृत सूत्रांनी अधिकृतपणे यास मान्यता दिली. या मान्यतेनंतर मेळघाटात घेतल्या गेलेली ही नोंद देशातील पहिली नोंद ठरली आहे. मोर्फोलॉजी पुष्टीकरण आणि जागतिक शास्त्रज्ञांच्या पुनरावलोकनानंतर यावर हे शिक्कामोर्तब झाले आहे.
ट्रोकीझोडियम व्हेरीडूरबीयम नावाचा हा कोळी (स्पायडर ) असून मुंगीसारखा तो दिसतो. हा कोळी पूर्णपणे निशाचर असून जमिनीवर राहतो. तो आपले जाळे विणत नाही. झाडांच्या पालापाचोळ्याखाली तो आढळून येतो. हा कोळी(स्पायडर) मुंग्या आणि उधळीला खातो. झाडांना हानी पोहोचविणाऱ्या लहान किड्यांना मारतो. कीड नियंत्रणाचे काम करतो.
मेळघाटात स्पायडरच्या 204 प्रजाती आहेत. सातपुड्यातील स्पायडरच्या जैवविविधते अंतर्गत हा कोळी नर नोंदल्या गेला. यावर दयार्पूरच्या जे डी पाटील सांगळुदकर महाविद्यालयातील स्पायडर रिसर्च प्रयोगशाळेत अभ्यास केल्या गेला. या दरम्यान सुभाष कांबळे, डॉ.गजानन संतापे, डॉ. महेश चिखले, डॉ.सावन देशमुख यांचे डॉ अतुल बोडखे यांना सहकार्य लाभले. डॉ. अतुल बोडखे यांनी केलेल्या या संशोधनात, तपासात डॉ. व्ही पी उनियाल आणि भारतीय वन्यजीव संस्थेच्या डॉ. शाझिया क्वेशीन यांचे मार्गदर्शन राहले. दर्यापूर येथील या स्पायडर रिसर्च प्रयोगशाळेने आतापर्यंत स्पायडरच्या 17 प्रजाती समर्पित केल्या आहेत.
यापूर्वी मुंगी कोळीच्या मादीची पहिली नोंद 2016 मध्ये गांधिनगर( गुजरात) मधील पलाजजवळील अरण्यपार्कमध्ये, प्रजापती आणि अन्य दोघांनी घेतली होती.
मुंगी कोळी नरासोबतच मेळघाटात मादी मुंगी कोळीसुद्धा वास्तव्यास आहेत. मेळघाटात 204 हुन अधिक स्पायडरच्या(कोळी) प्रजाती आहेत. नव संशोधकांनी यांच्या अभ्यासाकडे वळायला हवे. दर्यापूर येथील सुसज्ज अशा स्पायडर रिसर्च लॅबचा त्यांनी अभ्यासाकरिता उपयोग घेण्याची गरज असल्याचे मत डॉ अतुल बोडखे यांनी या अनुषंगाने व्यक्त केले.