अमरावतीतील पोहरा-मालखेड जंगलात रानगवाची पहिली नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 14:29 IST2024-12-13T14:28:00+5:302024-12-13T14:29:41+5:30
Amravati : जंगलात विविध प्रजातीचे पक्षी, वन्यप्राणी आढळून येणे ही बाब आनंददायी ठरणारी

First record of Ranagava in Pohra-Malkhed forest
अमोल कोहळे / अमरावती
पोहरा बंदी (अमरावती) : पोहरा-मालखेड राखीव जंगल हे अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पानंतर सर्वांत मोठे जंगल. या जंगलामध्ये वाघ, बिबट, जंगली कुत्रा, तडस, लांडगे, हरीण, निलगाय असे प्राण्यांची नियमित अस्तित्व असते, पण रानगवा पहिल्यांदाच आढळला आहे. हे समृद्ध जंगलाचे लक्षण मानले जात आहे.
युथ फॉर नेचर कॉन्झर्व्हेशन ही संस्था बिबट, वाघ यासारख्या प्राण्यांवर अमरावती वनविभाग सोबत संशोधन करत आहे. ज्यामध्ये ट्रॅप कॅमेऱ्याच्या मदतीने वन्यप्राण्यांच्या हालचालीवर लक्ष्य ठेवण्यात येते. या दरम्यान अमरावती लगत असणाऱ्या वन क्षेत्रात विशिष्ट प्रकारचे खुराचे निशाण आढळले व ते रान गव्याचे असल्याची शंका असल्याने तीथे ट्रॅप कॅमेरा लावण्यात आला आणि दुसऱ्याच दिवशी त्या कॅमेरात रानगव्याचे छायाचित्र कॅमेऱ्यात आले आहे. पोहरा -मालखेड या जंगलामध्ये अशा प्रकारची ही प्रथम नोंद असल्याचे संस्थेचे अध्यक्ष व वन्यजीव अभ्यासक डॉ स्वप्नील सोनोने यांनी सांगितले. या समृद्ध जंगलात विविध प्रजातीचे पक्षी, वन्यप्राणी आढळून येणे ही बाब आनंददायी ठरणारी आहे. अमरावती प्रादेशिकच्या वनसंरक्षक जयोती बॅनर्जी, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, सहाय्यक वनसंरक्षक देसाई, वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे, भानुदास पवार यासह वनविभागाचे कर्मचारी व युथ फॉर नेचर कॉन्झर्व्हेशनची टीम या प्राण्याच्या संवर्धनासाठी सोबत काम करत आहे.
"अमरावती प्रादेशिक वन विभागांतर्गत येणारे हे जंगल १०० चौ किमी पेक्षा जास्त क्षेत्रामध्ये पसरलेले असून येथे २७५ पेक्षा जास्त पक्ष्यांची नोंद आहे. यामध्ये स्थानिक व स्थलांतर करुन येणाऱ्या पक्ष्यांचा समावेश आहे, तसेच विविध फुलपाखराच्या व कीटकांच्या प्रजातीची नोंद आहे. रानगव्याचा अस्तित्वाने या जंगलाची समृद्धी अधोरेखित होते."
- धैर्यशील पाटील, उपवनसंरक्षक अमरावती
"रानगवा हा गोवंश कुलातील सगळ्यात मोठा प्राणी आहे व हा शाकाहारी असुन त्यांच्या सध्याच्या जगातील लोकसंख्येपैकी ८५ टक्के भारतात आहेत. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत शेड्यूल एक प्रजाती म्हणून सूचिबद्ध आहेत आणि इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचरच्या रेड लिस्टमध्ये ‘असुरक्षित’ म्हणून घोषित केले आहेत."
-डॉ. स्वप्नील सोनोने, वन्यजीव अभ्यासक