पांढऱ्या गालाच्या तांबट पक्ष्याची विदर्भातील पहिलीच नोंद मेळघाटच्या जंगलात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:13 AM2021-03-19T04:13:25+5:302021-03-19T04:13:25+5:30
अमरावती : पक्षीनिरीक्षणाकरिता मेळघाटच्या जंगलात गेलेल्या प्रशांत निकम, संकेत राजूरकर आणि कौशिक तट्टे यांना आणखी एका पक्ष्याची म्हणजे ...
अमरावती : पक्षीनिरीक्षणाकरिता मेळघाटच्या जंगलात गेलेल्या प्रशांत निकम, संकेत राजूरकर आणि कौशिक तट्टे यांना आणखी एका पक्ष्याची म्हणजे पांढऱ्या गालाचा तांबटची प्रथमच छायाचित्रासह नाेंद करण्यात यश आले. व्हाईट चिक बार्बेट असे इंग्रजी नाव असणाऱ्या या पक्ष्याला शास्त्रीय भाषेत सिलोपोगॉन वायरिडीस असे म्हणतात. या पक्ष्याची लांबी १६ ते १९ से.मी. असते. इतर बऱ्याच तांबट पक्ष्यांप्रमाणे हिरव्या रंगाचा हा पक्षी त्याच्या फिकट तपकिरी डोके, त्यावरील पांढरी छोटी भुवई आणि गालावरची पांढऱ्या मोठ्या पट्ट्यामुळे वेगळा ओळखण्यास सहज सोपे जाते. याची छाेटी परंतु मजबूत गुलाबी रंगाची चोच झाडाच्या फांद्या किंवा खोडाला कोरून छिद्र वजा घरटे तयार करण्यासाठी अतिशय योग्य. भारताच्या दक्षिण भागात तो प्रामख्याने आढळतो. महाराष्ट्रात मात्र कोकण आणि पश्चिम भागात हा बऱ्याच प्रमाणात आढळतो. फळे आणि फळबिया हे या पक्ष्यांचे मुख्य खाद्य असले तरी छाटे कीटक, पतंग आणि कृमीसुध्दा याच्या आहाराचा भाग आहे. फळे खाताना त्यांच्या कठीण बीया जमिनीवर पडतात. योग्य वातावरण मिळाल्यास पुन्हा उगवतात. त्यामुळे हा पक्षी 'बीज प्रसारक' म्हणूनही ख्यातीप्राप्त आहे. उन्हाळ्यात वीण घालणारा हा पक्षी जोडीदाराला आकर्षित करण्याकरिता साधारणपणे सकाळच्या उन्हात बराच वेळ तीव्र आवाजात शीळ घालू शकतो. मुद्दाम पक्षीनिरीक्षणाकरिता केलेल्या मेळघाट भ्रमणात १३ ते १५ मार्च या दरम्यान 'राखी रानपाकोळी, टिकलेचा, कस्तुर, निळ्या डोक्याचा कस्तुर, भारतीय निळा दयाळ, लांब पायाचा बाज, बाकचोच सातभाई या नेहमी सहजपणे दृष्टीस न पडणाऱ्या पक्ष्यांचेही दर्शन झाले.
शुष्क पानगळीच्या जंगल प्रदेशात सहसा आढळुन न येणारा पक्षी म्हणून याची ओळख असल्याने या पक्ष्याची विदर्भात काेरड्या प्रदेशात ही प्रथम नोंद महत्त्वाची ठरते. त्यानुसार मेळघाट हे अजूनही बऱ्याच दुर्मीळ वन्यजीव आणि पक्षी यांचा अधिवास आहे हे अधारेखित होते, असा ठाम विश्र्वास प्रशांत निकम यांनी व्यक्त केला.