आधी माघार नंतर होकार, आता लोकसभा लढवणार; आनंदराज आंबेडकरांनी भूमिका केली स्पष्ट
By उज्वल भालेकर | Published: April 7, 2024 07:21 PM2024-04-07T19:21:40+5:302024-04-07T19:23:15+5:30
कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव तसेच मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे आपण निर्णय बदलल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
अमरावती: अमरावती लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा करणाऱ्या आनंदराज आंबेडकर यांनी अखेर निर्णय बदलवून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. रविवारी त्यांनी पत्रकार परिषदेतून आपली भूमिका स्पष्ट केली. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव तसेच मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे आपण निर्णय बदलल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असलेले आनंदराज आंबेडकर यांनी ‘रिपब्लिकन सेना’ या पक्षावर अमरावती लोकसभा मतदारसंघातून २ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी अर्ज दाखल करताना निघालेल्या त्यांच्या रॅलीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी न झाल्याने त्यांनी दुसऱ्याच दिवशीच म्हणजेच ३ एप्रिलला सायंकाळी आपण उमेदवारी मागे घेत असल्याचे जाहीर पत्र काढून ‘वंचित’ला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ४ एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा देत ‘वंचित’चा उमेदवार अर्ज दाखल करणार नसल्याचे पत्र काढले होते. मात्र यानंतरही आनंदराज आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा हा फसवा असल्याचे सांगत त्यांनी उमेदवारी मागे घेण्याच्या निर्णयावर ते ठाम असल्याचे जाहीर केले होते.
त्यानंतर मागील दोन दिवसांपासून ते आपल्या निर्णयाबद्दल मौन बाळगून होते. अशातच त्यांनी रविवारी आपण निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. अमरावतीमधून आंबेडकरी समाजाचे नेतृत्व करणारा एकही पक्ष नसल्याने तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा वारंवार आग्रहामुळे निवडणूक लढण्याचा निर्णय घेत असल्याचे आनंदराज यांनी स्पष्ट केले. यावेळी रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खांबाळकर, ‘वंचित’चे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल बरडे आदी उपस्थित होते.