आधी जेवणातून, नंतर सलाईनमधून विष देऊन जन्मदात्रीला संपविले, लहान भावाचाही घेतला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 01:26 PM2023-09-05T13:26:32+5:302023-09-05T13:28:00+5:30
मोर्शीतील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा
मोर्शी (अमरावती) : जन्मदात्री आई आणि लहान भावाला सलाइन आणि जेवणातून विष देऊन कायमचे संपविणाऱ्या आरोपी मुलाला ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने हैदराबाद (तेलंगणा) येथील एका हॉटेलमधून अटक केली आहे.
सौरभ गणेश कापसे (२४) असे आरोपीचे नाव आहे. तो नाव बदलून राहत होता. तंत्रज्ञानात तज्ज्ञ असलेल्या सैरभला त्याची आई नीलिमा गणेश कापसे (४८, रा. शिवाजीनगर, मोर्शी) यांचे कोणासोबत तरी अवैध संबंध असल्याचा संशय होता. तसेच, याची माहिती लहान भाऊ आयुष कापसे (२०) याला माहिती असतानाही त्याने याबद्दल काहीही सांगितले नाही, या कारणावरून दोघांनाही संपविण्याचा कट सौरभने रचल्याची माहिती एलसीबीचे प्रमुख किरण वानखेडे यांनी दिली.
अमरावती येथे सार्वजनिक बांधकाम विभागात कंत्राटी टेक्निशियन म्हणून काम करत होता. त्याने आपल्या आई आणि लहान भावाला संपविण्याचा कट हा मे महिन्यातच रचला होता. यासाठी त्याने इंटरनेटवर शोध घेत कोणत्या औषधाचा किती परिणाम होईल, आणि किती दिवसांनी मृत्यू होईल यांची संपूर्ण माहिती घेतली होती. परंतु, तीन महिन्यांपूर्वीची योजना यशस्वी झाली नाही. सौरभने आईला बक्स नावाचे औषध जेवणातून दिले होते. परंतु, आईला काहीही झाले नाही. यानंतर त्यांने आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील काही मित्रांकडून औषधांविषयी माहिती जाणून घेतली. यानंतर मेडिकल क्षेत्रातील एका मित्राच्या लायसन्सद्वारे प्रतिबंधित औषधी मागवून त्या जवळ ठेवल्या होत्या.
सौरभने असा रचला कट
सौरभची आई ही मोर्शी पंचायत समितीमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करत होती. तर, भाऊ आयुष हा शिक्षण घेत होता. दोघंही जेवणाचा डब्बा सोबत घेऊन जात होते. २३ ऑगस्ट रोजी दोघेही जात असताना त्याचवेळी सौरभने त्यांच्या जेवणामध्ये विषारी औषध मिसळले. दुपारी दोघांनी जेवण केल्यानंतर त्यांची प्रकृती थोडीशी खालावली. यावेळी सौरभनेच दोघांनाही घरी आणले. त्याने आईच्या प्रकृतीबद्दल आपल्या मित्राला सांगितले. आणि घरीच सलाइन लावण्याचा निर्णय घेतला. आणि रात्री त्याने सलाइनच्या बाटलीत विषारी औषध टाकून आई व लहान भावाला सलाइन लावली. काही वेळाने दोघांचाही मृत्यू झाला.
मृतदेह ताडपत्रीत गुंडाळून काढला पळ
आरोपी सौरभने ती रात्र घरीच काढली. त्यानंतर २४ ऑगस्टला तो घरातून बाहेर पडत दुसऱ्या दिवशीच घरी आला. यावेळी त्याने ताडपत्री साेबत आणली होती. त्याने आई आणि भाऊ दोघांचेही मृतदेह ताडपत्रीत गुंडाळून बेडच्या आत ठेवले. आणि मागच्या दाराला कुलूप लावून अमरावतीला आला. येथून तो पहिले शिर्डी नंतर हैदराबादला गेला. तो तिथे एका हॉटेलमध्ये बदललेल्या नावाने राहत होता. घटनेच्या रात्री त्याने आईच्या खात्यातून दीड लाख रुपये आपल्या खात्यात जमा केले होते. एसपी अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पीआय श्रीराम लांबडे, किरण वानखडे यांच्या पथकाने या घटनेचा पूर्ण तपास लावला. चांदूरबाजार पोलिस ठाण्यातही आरोपी सौरभ विरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल आहे.