दशकात पहिल्यांदाच रब्बीचे उच्चांकी ४० टक्के वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:09 AM2021-01-01T04:09:09+5:302021-01-01T04:09:09+5:30
अमरावती : दशकात पहिल्यांदा जिल्ह्यातील रब्बी कर्जवाटपाचा टक्का ४० वर पोहोचला आहे. आतापर्यंत २५ टक्के हे उच्चांकी ...
अमरावती : दशकात पहिल्यांदा जिल्ह्यातील रब्बी कर्जवाटपाचा टक्का ४० वर पोहोचला आहे. आतापर्यंत २५ टक्के हे उच्चांकी कर्जवाटप असल्याचे सहकार विभागाने सांगितले. यंदा दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची प्रक्रिया ऑगस्टपर्यंत सुरू होती. यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाल्याने त्यांना नव्याने कर्ज मिळाले आहे.
जिल्ह्यात साधारणपणे रब्बीचे कर्जवाटप हे २२ ते २५ टक्क्यांच्या दरम्यान राहिले आहे. यंदा मात्र, ४० टक्क्यांवर पोहोचले. विशेष म्हणजे यंदा खरिपाचे ६२ टक्के कर्जवाटप हेदेखील पाच वर्षांत उच्चांकी ठरले आहे. यंदा रब्बीचे कर्जवाटपासाठी जिल्ह्याला ४३० कोटींचे लक्ष्यांक देण्यात आले होते. त्या तुलनेत आतापर्यंत १८ हजार १३३ शेतकऱ्यांना १७२.३१ कोटींचे कर्जवाटप करण्यात आलेले आहे व बँकास्तराववर सध्या ही प्रक्रिया सुरू असल्याचे सहकार विभागाने सांगितले.
राष्ट्रीयीकृत बँकांना २९४.४० कोटींचे लक्ष्यांक असताना आतापर्यंत १८ हजार ४१ शेतकऱ्यांना १७१.१६ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. ही ५८ टक्केवारी आहे. याशिवाय ग्रामीण बँकांना ३.६० कोटींचे लक्ष्यांक असतांना ९२ शेतकऱ्यांना १.५५ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले, ही ४३ टक्केवारी आहे. जिल्हा बँकेला १३२ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असतांना प्रत्यक्षात कर्जवाटप निरंक आहे.