पाच वर्षांत पहिल्यांदा रबीचे सरासरी क्षेत्र पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:10 AM2020-12-29T04:10:57+5:302020-12-29T04:10:57+5:30
अमरावती : सुरुवातीला कमी पाऊस, वांझोटे सोयाबीन बियाणे व नंतर ऑगस्टपासून लागलेली पावसाची रिपरिप यामध्ये खरिपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात ...
अमरावती : सुरुवातीला कमी पाऊस, वांझोटे सोयाबीन बियाणे व नंतर ऑगस्टपासून लागलेली पावसाची रिपरिप यामध्ये खरिपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांची मदार रबी हंगामावर आहे. पाच वर्षांत पहिल्यांदा रबीचे सरासरी क्षेत्र पार झाले आहे. सद्यस्थितीत १ लाख ५९ हजार ९६८ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. ही सरासरी प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत १११ टक्के असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस सर्वच तालुक्यात झाल्याने जमिनीत आर्द्रता चांगली आहे. प्रकल्पातही संचयपातळी एवढा पाणीसाठा असल्याने रबीला पाण्याच्या पाळ्या मिळणार असल्यानेही दिलासा मिळाला आहे. तसेही खरिपातील सोयाबीन उद्ध्वस्त झाल्याने या क्षेत्रात शेतकऱ्यांनी हरभऱ्याची पेरणी केली. याशिवाय गुलाबी बोंडअळी व बोंडसडमुळे कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने अनेक भागांत कपाशीमध्ये रोटाव्हेटर फिरविला जात आहे. या क्षेत्रातही गहू व हरभऱ्याची पेरणी होत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात यंदा रबीसाठी १ लाख ४५ हजार १८१ हेक्टर सरासरी क्षेत्र प्रस्तावित असताना सद्यस्थितीत १ लाख ५९ हजार हजार ९६८ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. याव्यतिरिक्त आणखी गव्हाची पेरणी जानेवारी अखेरपर्यंत होणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले. सद्यस्थितीत रबी ज्वारी ६४.८ हेक्टर, गहू ३६,८२९ हेक्टर, मका ८१९.९० हेक्टर, हरभरा १,१७,३६३ हेक्टर, करडई २ हेक्टर, जवस ८ हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे.
बॉक्स
हरभऱ्याचे सर्वधिक क्षेत्र
यंदा हरभऱ्याचे उच्चांकी पेरणीक्षेत्र आहे. धारणी तालुक्यात १२,७५४ हेक्टर, चिखलदरा १७५० हेक्टर, अमरावती ६,४३१ हेक्टर, भातकुली ८१९९ हेक्टर, नांदगाव खंडेश्वर ७,९१० हेक्टर, चांदूर रेल्वे ४,५१५ हेक्टर, तिवसा ८,१६८ हेक्टर, मोर्शी ७,८४८ हेक्टर, वरूड ३,५९५ हेक्टर, दर्यापूर २१,५१६ हेक्टर, अंजनगाव सुर्जी ५६८० हेक्टर, अचलपूर ४,७३८ हेक्टर, चांदूर बाजार ११,०३६ हेक्टर व धामणगाव रेल्वे तालुक्यात १३,२२२ हेक्टरमध्ये हरभऱ्याची पेरणी झालेली आहे