अमरावती जिल्ह्यातील मोर्शीत उष्माघाताचा पहिला बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 11:09 AM2018-04-04T11:09:01+5:302018-04-04T11:09:34+5:30
विदर्भात उन्हाळा अद्याप कडक तापायचा असतानाच उष्माघाताच्या धक्क्याने बळी जाण्याच्या घटना सुरू झाल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विदर्भात उन्हाळा अद्याप कडक तापायचा असतानाच उष्माघाताच्या धक्क्याने बळी जाण्याच्या घटना सुरू झाल्या आहेत. मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथील ६८ वर्षीय वृद्ध भीमराव लखुजी बागडे यांचा मोर्शी येथे २ एप्रिलचे सायंकाळी ७ च्या सुमारास काम आटोपून किराणा दुकानात जात असताना अचानक जमिनीवर कोसळून मृत्यू झाला. उष्माघाताचा बळी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये असून शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी तशी शक्यता वर्तविली आहे.
मोर्शी येथील श्रीनगर परिसरात एका बांधकामावर देखरेखीचे काम करणारे इसम भीमराव लखुजी बागडे हे २ एप्रिलच्या सायंकाळी ७ वाजतादरम्यान दैनंदिन कामे आटोपून किराणा दुकानात खरेदी करायला जात असताना एकाएकी जमिनीवर कोसळले. परिसरातील नागरिकांनी धाव घेतली असता ते मृतावस्थेत आढळले. नगरसेवक हर्षल चौधरी यांनी मृतदेह रुग्णवाहिकेने उपजिल्हा रुग्णालयात पोहचविण्याची व्यवस्था केली. सध्या तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून तशी सूचनाही हवामान खात्याने दिली आहे. तीव्र तापमानामुळे उष्माघाताने बागडे यांचा मृत्यू झाला, अशी नागरिकांमध्ये चर्चा असून शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी तशी शक्यता वर्तविली आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर कळू शकेल, असेही त्यांनी सांगितले.
भीमराव बागडे यांचे मागे पत्नी, दोन वैवाहीक मुली, एक मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला. बागडे यांच्या अचानक मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.