म्युकर मायकोसिसचा अमरावतीत पहिला बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:13 AM2021-05-16T04:13:13+5:302021-05-16T04:13:13+5:30
अमरावती : शहरातील झेनिथ हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल ६३ वर्षीय महिलेचा कोरोनापश्चात उद्भवणाऱ्या म्युकरमायकोसिस या आजाराने शुक्रवारी निधन झाल्याची माहिती ...
अमरावती : शहरातील झेनिथ हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल ६३ वर्षीय महिलेचा कोरोनापश्चात उद्भवणाऱ्या म्युकरमायकोसिस या आजाराने शुक्रवारी निधन झाल्याची माहिती रुग्णालयीन सूत्रांनी दिली. ही महिला म्युकरमायकोसिसची जिल्ह्यातील पहिली बळी ठरली असल्याचे बोलले जात आहे.
सूत्रांनुसार, स्थानिक साईनगर भागातील ज्योती देशपांडे नामक महिला महिनाभरापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्यांच्यावर महेश भवनातील खासगी कोविड उपचार केंद्रात उपचार झाले. त्यातून बरे होऊन त्या घरी परतल्या होत्या.
आठ दिवसांपूर्वी ज्योती देशपांडे यांचे डोळे आणि दात दुखायला लागल्याने त्यांना झेनिथ हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. कोरोना झालेला असल्याने म्युकरमायकोसिससंबंधी तपासण्या त्यांच्यावर करण्यात आल्या. म्युकरमायकोसिसचे निदान झाल्याने त्यासंबंधी उपचार करण्यास डॉक्टरांनी प्रारंभ केला. तथापि, त्यांचे शरीर उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. त्यांचा टाळूचा भाग काढावा लागेल, असा सल्ला उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी नातेवाइकांना दिला. त्यावर नातेवाइकांनी निर्णय देण्याआधीच शुक्रवारी ज्योती देशपांडे यांची प्राणज्योत मालवली. सायंकाळीच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, याबाबत ‘लोकमत’ने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांमार्फत या घटनेची शहानिशा करणार असल्याचे सांगितले.
शासकीय रुग्णालयात दाखल झालेली नसल्याने सदर महिलेच्या आजाराविषयी सांगता येणार नसल्याचे अमरावती महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी कळविले.
कोट
महिलेचा मृत्यू झाला आहे. मात्र, मृत्यूचे कारण म्युकरमायकोसिस वा अन्य कोणता आजार, याबाबत पुष्टी झालेली नाही. याबाबत अहवाल मागविला आहे.
- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक