प्रथमेशवर शस्त्रक्रिया, आई-वडील नि:शब्दच!

By admin | Published: August 9, 2016 11:54 PM2016-08-09T23:54:12+5:302016-08-09T23:54:12+5:30

पिंंपळखुटा येथील संत श्री शंकर महाराज विद्यामंदिरात रक्ताच्या थारोळ्यात आढळलेला चिमुकला प्रथमेश अद्यापही बेशुद्ध आहे.

Firstly surgery, parents and mute! | प्रथमेशवर शस्त्रक्रिया, आई-वडील नि:शब्दच!

प्रथमेशवर शस्त्रक्रिया, आई-वडील नि:शब्दच!

Next

संत श्री शंकर महाराज विद्यामंदिर : घातपाताचा संशय, दोषींवर कठोर कारवाईची मागणी 
अमरावती : पिंंपळखुटा येथील संत श्री शंकर महाराज विद्यामंदिरात रक्ताच्या थारोळ्यात आढळलेला चिमुकला प्रथमेश अद्यापही बेशुद्ध आहे. नागपूर शहरातील एका खासगी इस्पितळात त्याच्यावर सोमवारी रात्री शस्त्रक्रिया झाली. प्रथमेशची मृत्यूशी झुंज सुरू आहे. पोटच्या गोळ्याची अचानक अशी अवस्था पाहून त्याचे आई-वडिल नि:शब्द झाले आहेत. दरम्यान या प्रकरणाच्या तपासासाठी नागपूर येथे गेलेले मंगरूळ दस्तगिर पोलीस रिकाम्या हातानेच परतले.
१०-११ वर्षांचा चिमुकला प्रथमेश. अमरावती येथील सूर्यभान सगणे यांचा मुलगा. आई-वडिलांचा मजुरीवरच उदरनिर्वाह. मात्र, प्रथमेशला उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी त्यांचा खटाटोप चाललेला. त्यांनी धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिंपळखुटा येथील संत श्री शंकर महाराज विद्यामंदिराच्या व्यवस्थापनावर त्यांचा गाढा विश्वास. म्हणूनच या विद्यामंदिरात त्यांनी प्रथमेशला प्रवेश दिला. तेथील वसतिगृहातच तो राहू लागला. विश्वासातच घात झाला. अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या लहानग्या प्रथमेशच्या आई-वडिलांना उभ्या ठाकलेल्या संकटाची कल्पना नव्हती. पण, रविवार उगवला तो अकल्पित घेऊनच.

घातपाताचा संशय
अमरावती : गळा चिरलेल्या अवस्थेत प्रथमेश विद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर निपचित पडलेला आढळला. सारेच हादरले. त्याला जिल्हा सामान्य रूग्णालयात आणि नंतर नागपूरला हलविण्यात आले. घटना भयंकर होती. आई-वडिलांचा तर श्वासच अडकला. अनेक चर्चा सुरू झाल्या. कुणी म्हणाले, चिमुकल्या प्रथमेशने आत्महत्येचा प्रयत्न केला. कुणी म्हणाले तो वरून पडला. पण, या दोन्ही शक्यता जन्मदात्यांना मान्य नाहीत. त्यांना घातपाताचा संशय आहे. ज्याने कुणी चिमुरड्या प्रथमेशची ही अवस्था केलीय, त्याला कठोर शासन व्हावे, इतकेच सगणे कुटुंबाचे म्हणणे आहे.
नागपूरच्या खासगी इस्पितळात शस्त्रक्रिया झाल्यानंतर प्रथमेशचा धोका टळलाय. बेशुद्ध असला तरी सात दिवसांनी त्याची जखम बरी होईल आणि हळूहळू तो पूर्ववत होईल. परंतु या घटनेमुळे झालेला कुठाराघात पचविण्याची सध्या तरी सगणे दाम्पत्याची मानसिकता नाही. या घटनेमुळे शिक्षणासाठी घरापासून लांब, वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

वसतिगृह अधीक्षकासह दोघांची चौकशी
समाज कल्याण विभागाद्वारे चालविण्यात येणाऱ्या संत शंकर महाराज विद्यामंदिर परिसरातील या वसतिगृहाचे अधीक्षक दिलीप मोहिजे, चतुर्थश्रेणी कर्मचारी नीलेश सहारे, मदतनीस बंटी मोहिजे यांना ताब्यात घेऊन मंगरूळ दस्तगिर पोलिसांनी तब्बल बारा तास चौकशी केली. या चौकशीत अनेक प्रश्नांचा उलगडा होणे अपेक्षित होते. मात्र, पोलीस प्रशासनाने चौकशीचा तपशिल सांगण्यास सांगण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या घटनेचे नेमके कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.

रित्या हाताने परतले पोलीस
गंभीर अवस्थेत नागपूर येथील खासगी रूग्णालयात प्रथमेशला दाखल केल्यानंतर तब्बल चार तासांनी अमरावती कंट्रोल रूममधून मंगरूळ पोलिसांना याप्रकरणाची माहिती देण्यात आली. पश्चात मंगरूळचे पीएसआय एस़व्ही़ ठावरे व हेड कॉन्सटेबल त्र्यंबक काळे नागपूरकडे रवाना झाले. तेथे त्यांनी प्रथमेशची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अतिदक्षता कक्षात दाखल असल्यामुळे त्यांना प्रथमेशचे बयाण नोंदविता आले नाही.

सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात कुचराई
शाळा व वसतिगृह परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश शिक्षण विभागाने यापूर्वीच दिले आहेत. येथून नजीकच असलेल्या संत शंकर महाराज विश्वधाम मंदिर परिसरात कॅमेरे लावण्यात आले. वसतिगृह आणि शाळा परिसरात कॅमेरे लावताना कुचराई करण्यात आली. या शाळेच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे असते तर पोलिसांना तपासात मदत झाली असती.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे
काय ?
शाळा-महाविद्यालयांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी त्या-त्या व्यवस्थापनावर असते. मात्र, संत श्री शंकरमहाराज विद्यामंदिर व्यवस्थापनाच्या लक्षात बराच वेळाने ही बाब आली. सुटी असल्याने नेमका प्रकार कसा घडला, हे देखील कळले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

लहान मुलांच्या भांडणातून हा प्रकार घडल्याचे प्रथमदर्शनी चौकशीतून निष्पन्न होत आहे. मात्र, अद्याप नेमके कारण कळले नाही. चौकशी सुरू आहे. लवकरच तथ्य बाहेर येईल. -श्रीनिवास घाडगे, एसडीपीओ, चांदूररेल्वे

प्रथमेशच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्याचेच बयाण ग्राह्य धरले जाईल. त्यानंतरच यातील सत्य बाहेर येईल.
-शैलेंद्र शेळके, ठाणेदार, मंगरूळ दस्तगिर पोलीस ठाणे

Web Title: Firstly surgery, parents and mute!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.