धरणातील मासोळ्या पाण्याबरोबर पडल्या बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 01:18 AM2019-08-11T01:18:02+5:302019-08-11T01:18:43+5:30
मुसळधार पावसामुळे अचलपूर तालुक्यातील सपन, चंद्रभागा व शहानूर प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसाठा झाल्यामुळे प्रकल्पाची दारे उघडली गेली आहेत. नदीपात्रात सोडण्यात येत असलेल्या धरणाच्या पाण्यासोबत मासोळ्या धरणाबाहेर पडत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : मुसळधार पावसामुळे अचलपूर तालुक्यातील सपन, चंद्रभागा व शहानूर प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसाठा झाल्यामुळे प्रकल्पाची दारे उघडली गेली आहेत. नदीपात्रात सोडण्यात येत असलेल्या धरणाच्या पाण्यासोबत मासोळ्या धरणाबाहेर पडत आहेत.
नदीपात्रात आढळून येणाऱ्या या धरणातील मासोळ्या गावकऱ्यांसाठी पर्वणी ठरत आहेत. अधिक वजनाच्या मोठ्या मासोळ्या पकडण्यात अनेक जण गुंतले आहेत.
शहानूर, चंद्रभागा आणि सपन धरणात मोठ्या प्रमाणात मासोळ्या आहेत. मत्स्यपालन सहकारी संस्था ठेका पद्धतीने या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात मासोळी उत्पादन घेतात. यात शहानूर आणि चंद्रभागा धरणावर उपलब्ध होणारी ताजी मासोळी सर्वत्र प्रसिद्ध आहे. ताजी मासोळी विकत घेण्याकरिता दूरदुरून ग्राहक निर्धारीत वेळेत धरणावर बघायला मिळतात.
शहानूर धरणातील मासोळीला अंजनगाव बाजारात, तर चंद्रभागा धरणातील मासोळीला परतवाडा बाजारात अधिक मागणी आहे. या दोन्ही धरणावरील जिवंत मासोळ्या लहान ट्रकमधून जिल्ह्याबाहेरही पाठविल्या जातात.
सपन नदीपात्रात पाण्यासोबत वाहून आलेल्या मासोळ्या काहींच्या हाती लागल्या आहेत. हाती लागलेल्या माशांचे त्यांनी मोठ्या हौसेने छायाचित्रेही काढली आहेत.
दरम्यान, धरणस्थळी व नदीपात्रात खेकड्यांची पिलावळ वाढली आहे. गढूळ पाणी वाहताच सुप्तावस्थेतील खेकडे बाहेर पडतात.
मेळघाट, अचलपुरात २३०० मिमी
चिखलदरा, धारणी व अचलपूर तालुक्यात पाऊस झाल्यानंतर तिन्ही प्रकल्प ओसांडून वाहू लागतात. १० आॅगस्टपर्यंत धारणी तालुक्यात ९०९.५ मिमी (१३४.६ टक्के), चिखलदरा तालुक्यात १०७३.५ मिमी (१२१.४ टक्के), तर अचलपूर तालुक्यात ५१५.३ मिमी (११९.१ टक्के) पावसाची नोंद झाली. वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत धारणीत ७७.६, चिखलदरा ७०.३ व अचलपुरात ७३.९ टक्के पाऊस झाला.