गोळीबारात आदिवासी जखमी; मेळघाटात संघर्ष चिघळला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 06:14 AM2019-01-24T06:14:41+5:302019-01-24T06:15:18+5:30
मेळघाटातील व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात असलेल्या गावांतील आदिवासी आणि वनखात्यातील संघर्ष कालच्या घटनेनंतर अधिकच चिघळला
चिखलदरा/धारणी (अमरावती) : मेळघाटातील व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात असलेल्या गावांतील आदिवासी आणि वनखात्यातील संघर्ष कालच्या घटनेनंतर अधिकच चिघळला असून, बुधवारी वन संरक्षकांनी केलेला गोळीबार व मारहाणीत २५ ते ३० आदिवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना अमोना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तेलपानीसह आठ पुनर्वसित गावांमधील आदिवासींनी जंगलातील त्यांच्या मूळगावी आठवडाभरापूर्वी बस्तान मांडले. त्यांना जंगलाबाहेर काढण्यासाठी वनविभागाने कंबर कसली आहे. वनाधिकारी व आदिवासी यांच्यातील चर्चा फिस्कटल्याने मंगळवारी सशस्त्र संघर्ष झाला. त्यामुळे येथील जंगलात लावण्यात आलेली आग धगधगत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
चिखलदरा तालुक्यातील तेलपाणी या आदिवासीे गावातील नागरिकांचे अकोट तालुक्यात पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र, तेथे पायाभूत सुविधा नाहीत. मोबदल्यातील शेती आणि पूर्ण आर्थिक साहाय्य अदिवासींना मिळालेले नाही. त्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे. बुधवारी दुपारी ४ च्या सुमारास विभागीय वनसंरक्षकांच्या नेतृत्वाखालील पथकाने तेलपानी येथील आदिवासींना जंगलाबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आदिवासी बधले नाहीत. त्यामुळे गोळीबार करण्यात आला. त्यात चंपालाल लाभू बेठेकर यांच्यासह काही आदिवासी जखमी झाले. जखमी चंपालाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, वनखात्याचे कर्मचारी आदिवासींवर जबरदस्ती करत आहेत. आदिवासींचा रहिवास असलेल्या जंगलास आग लावण्यात आली असून साहित्याची नासधूस करण्यात आली आहे. आदिवासी युवकांच्या १० दुचाकी पेटविल्या, तर २० दुचाकी जप्त केल्या. लाठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली.
चर्चेतून तोडगा निघाला नाही
पुनर्वसनस्थळी आदिवासींनी परत जावे, यासाठी त्यांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांना संबंधित गावांमध्ये पाठविले आहे. पटेल यांच्या सोबतीला उपविभागीय अधिकारी आणि पोलीसांचा ताफा आहे. पटेल यांनी अमोना कासोद येथील आदिवासींशी चर्चा केली, पण चर्चेतून कुठलाही तोडगा निघाला नाही.
अनेक कुटूंब परांगदा!
आदिवासी ग्रामस्थ वनखात्याच्या प्रचंड दहशतीखाली आहेत. दहशतीमुळे मुले, महिला व वृद्ध असे एकूण २० पेक्षा अधिक आदिवासी बेपत्ता झालेत. त्यांची माहिती अद्यापही मिळालेली नाही. बेपत्ता झालेल्यांमध्ये सोमठाणा येथील पसरराम दादू कासदेकर, त्यांच्या पत्नी व एक वर्षाचा मुलगा, बालकराम शंकर बेठेकर, पत्नी व मुलगा, मोती सानू कासदेकर, धारगड येथील बापूराव मान्सू सावलकर, सुरेंद्र हिरालाल कासदेकर, हिरा मावसकर, तेलपानी येथील हिराय फालतू कासदेकर यांचा समावेश आहे. दरम्यान, जखमी चंपालाल बेठेकर यांना अमोना कासोद येथे आणण्यात आले. मारहाणीत २५ ते ३० आदिवासी महिला-पुरुष जखमी झाले आहेत. त्यांनाही अमोना येथे हलविण्यात आले आहे.