इंदिरा गांधी मातृत्व योजनेचे पाच कोटी रुपये पडून
By Admin | Published: January 12, 2015 10:41 PM2015-01-12T22:41:50+5:302015-01-12T22:41:50+5:30
शासनाच्या विविध विभागांमार्फत शेकडो योजना राबविण्यात येतात. यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. तरीही मेळघाटातील कुपोषण कमी होत नाही. त्यामुळे शासनाचे पैसे अखर्चिक आहेत.
अमरावती : शासनाच्या विविध विभागांमार्फत शेकडो योजना राबविण्यात येतात. यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. तरीही मेळघाटातील कुपोषण कमी होत नाही. त्यामुळे शासनाचे पैसे अखर्चिक आहेत. धारणी व चिखलदरा तालुक्यात सन २०१४ मध्ये २६९ बालमृत्यूची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे मातांकरिता राबविल्या जाणाऱ्या महत्त्वाकांक्षी इंदिरा गांधी मातृत्व योजनेतील एकट्या अमरावती जिल्ह्यात सध्याही ५.२५ कोटी रुपये निधी अखर्चिक आहे.
वित्त विभागाचे अनौपचारिक संदर्भपत्र न मिळाल्यामुळे हा निधी पडून असल्याचे बोलले जात आहे. मागील वर्षभरात मेळघाटात २६९ बालमृत्यूची नोंद करण्यात आली असून यामध्ये धारणी तालुक्यातील १८९ तर चिखलदरा तालुक्यातील ८० बालमृत्यूचा समावेश आहे. ही सर्व बालके ० ते ६ वयोगटातील आहेत. मेळघाटसाठी अनेक योजना असताना व कोट्यवधी रुपये त्याकरिता दिले जात असताना केवळ प्रभावी अंमलबजावणीमुळे सतत बालमृत्यूचे प्रमाण वाढत आहेत. गर्भवती मातांचे योग्य पोषण होत नसल्याने कुपोषित बालके जन्माला येतात, हे लक्षात आल्यानंतर मातांसाठीदेखील विविध योजना शासनाने सुरू केल्या आहेत.