दहावीच्या परीक्षा अर्जांसाठी पाच दिवसांची मुदतवाढ
By admin | Published: November 20, 2014 10:43 PM2014-11-20T22:43:02+5:302014-11-20T22:43:02+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे ‘सर्व्हर डाऊन’ झाल्याने दहावीचे परीक्षा अर्ज भरण्यास अनेक शाळांना विलंब झाला. २० नोव्हेंबर या अंतिम तिथीच्या आत ४० टक्के शाळा आॅनलाईन
अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे ‘सर्व्हर डाऊन’ झाल्याने दहावीचे परीक्षा अर्ज भरण्यास अनेक शाळांना विलंब झाला. २० नोव्हेंबर या अंतिम तिथीच्या आत ४० टक्के शाळा आॅनलाईन प्रवेश अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकल्या नाहीत. त्यामुळे परीक्षा अर्ज भरण्यास पाच दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
गेल्या वर्षीपासून बारावीचे व यंदापासून दहावीचे परीक्षा अर्ज आॅनलाईन पध्दतीने भरण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने घेण्यात आला. २० नोव्हेंबर रोजी दहावीचे अर्ज भरण्याची शेवटची तिथी होती. परंतु मंडळाच्या संकेतस्थळाची गती गेल्या चार दिवसांपासून संथ असल्याने शाळांना अर्ज भरताना अडचण निर्माण झाली होती. अनेक शाळांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अर्ज भरण्यासाठी पाच दिवसांची मुदतवाढ दिली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)