विद्यापीठ उन्हाळी परीक्षांच्या अर्जास पाच दिवसांची मुदतवाढ; आता १८ मार्चपर्यंत भरता येणार
By गणेश वासनिक | Published: March 16, 2023 05:29 PM2023-03-16T17:29:23+5:302023-03-16T17:30:58+5:30
माजी, नियमित विद्यार्थ्यांंना संधी; शनिवार अखेरची डेडलाईन निश्चित, यापुढे अर्जास मुदतवाढ मिळणार नाही
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे आवेदन पत्र स्वीकारण्यास आता पाच दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. यापूर्वी ३ ते १३ मार्चपर्यंत परीक्षा आवेदनपत्र स्वीकारण्याची तारीख ठरविण्यात आली हाेती. मात्र, यात बदल करुन आता शनिवार, १८ मार्चपर्यंत विद्यार्थ्यांचे परीक्षा आवेदन पत्र स्वीकारण्याचा निर्णय परीक्षा विभागाने घेतला आहे. परीक्षा आवेदनपत्र न भरणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या उन्हाळी २०२३ माजी विद्यार्थ्यांच्या परीक्षा १० एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. तर नियमित प्रवेशित विद्यार्थ्यांच्या परीक्षा ११ मेपासून सुरूवात होत आहे. आतापर्यंत २ लाख ३२७ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहे. विद्यापीठ अंतर्गत अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिक व बुलढाणा या पाचही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या ६०० परीक्षा आणि १८० केंद्रावर नियोजन करण्यात येत आहे. परीक्षा फॉर्मसाठी ऑनलाईन लिंक उपलब्ध करण्यात आली आहे. सीबीसीएस पॅटर्ननुसार सर्व शाखांच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. माजी विद्यार्थी १० एप्रिल ते ३ मे या कालावधीत, तर नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा ११ ते ३१ मे या दरम्यान घेण्यात येणार आहे. विद्यापीठ अधिनस्थ १८० महाविद्यालयात परीक्षा केंद्र असणार आहे. उन्हाळी परीक्षांसाठी साडेतीन लाखांच्यावर विद्यार्थी परीक्षा देतील, असे नियोजन विद्यापीठाने केले आहे.
महाविद्यालयाकडून असे तारखेनुसार स्वीकारले जातील परीक्षा अर्ज
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा आवेदनपत्र सादर केल्यानंतर त्याची हार्ड कॉपी संबंधित महाविद्यालयांना शुल्कासह द्यावी लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचे परीक्षा आवेदन पत्र शुल्हासह महाविद्यालयांना विद्यापीठात २१ ते २५ मार्च यादरम्यान जमा करावे लागणार आहे. त्याकरिता विद्यापीठात स्वतंत्र टेबलची व्यवस्था करण्यात येणार आहे. यात अमरावती जिल्हा २१ मार्च, यवतमाळ २३ मार्च, बुलढाणा जिल्हा २४ मार्च, अकोला व वाशिम जिल्हा २५ मार्च रोजी परीक्षांचे आवेदनपत्र स्वीकारले जातील, अशी माहिती परीक्षा व मू्ल्यांकन मंडळाच्या प्रभारी संचालक मोनाली तोटे-वानखडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.