Amravati Building Collapse : 'क्या होगा...' म्हणत गेला ५ जणांचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2022 11:42 AM2022-10-31T11:42:21+5:302022-10-31T11:47:51+5:30

कोतवाली पोलिसांत नोंद; उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाने विभागीय आयुक्त करणार चौकशी

Five died, one seriously injured as old building collapses in Amravati | Amravati Building Collapse : 'क्या होगा...' म्हणत गेला ५ जणांचा जीव

Amravati Building Collapse : 'क्या होगा...' म्हणत गेला ५ जणांचा जीव

Next

अमरावती : पडेलच का, पडली तर बघून घेऊ, ‘क्या होगा? देख लेंगे’ या ‘आज करे सो कल’ प्रवृत्तीने अखेर पाच जणांचा बळी घेतला. मजूर आणि व्यवस्थापकावर नाहक मरण ओढवले. २८ फेब्रुवारी २०२० पासून महापालिकेने राजेंद्र लॉज या इमारतीमधील सहाही मालक वा भोगवटदारांना नोटीस बजावल्या. मात्र, आता वरचा माळा पाडल्यानंतर तळमजल्यावरील दुकानदारांना दुरुस्तीची जाग आली. ती दुरुस्ती डागडुजी करत रविवारी वरच्या माळ्याचे छत कोसळून त्याखाली व्यवस्थापकासह चार मजूर जीवंत गाडले गेले.

महापालिकेच्या लेखी शहरातील १३९ इमारती शिकस्त व अतिशिकस्त आहेत. पैकी ४२ तर पूर्णपणे पाडायच्या आहेत. तर ४४ इमारती खाली करून त्याची डागडुजी करण्याच्या नोटीस पालिकेने बजावल्या आहेत. त्यानुसार सी-वन वर्गवारीतील राजेंद्र लॉज ही पहिल्या मजल्यावरील इमारत काही दिवसांपूर्वी पाडण्यात आली. त्या पाडकामाचा मलमा राजदीप एम्पोरियम या दुकानाच्या वर होता. रविवारी राजदीपमध्ये गडर टाकून सपोर्ट देण्याचे काम सुरू असताना छत कोसळले. ती डागडुजी नेमकी कशी करावी, याबाबत तज्ज्ञांचे मत घेण्यात आले नाही. सोबतच दोन वर्षांपूर्वी ज्यावेळी नोटीस दिली गेली. त्यावेळीच जर डागडुजी केली असती, तर पाच बळी देखील गेले नसते. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी राजदीप बॅग हाऊसचे मालक सुशीला भरत शहा व हर्षल भरत शहा यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.

विभागीय आयुक्त करणार चौकशी

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण घटना जाणून घेतली. तथा अमरावती विभागीय आयुक्तांना चौकशीचे निर्देश दिले. त्यानुसार विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे हे चौकशी अहवाल डीसीएमकडे सादर करतील. दरम्यान, जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके यांनी घटनास्थळी भेट दिली.

अमरावती येथील इमारत कोसळली, पाच ठार, एक गंभीर

तज्ज्ञांची मते न घेता डागडुजी

राजेंद्र लॉजच्या तळमजल्यावरील राजदीप बॅग तथा राजदीप एम्पोरियम रिकामे करून डागडुजी करण्याची नोटीस राजापेठ झोन कार्यालयाकडून पाठविण्यात आली. त्यात कुणीही भाडेकरू राहात नसल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात अद्याप तेथे व्यवसाय केला जात होता. दुकान खाली करून त्याच्या डागडुजीची नोटीस बजावली होती. मात्र, संबंधितांनी महापालिकेच्या अभियंता किंवा तज्ज्ञांची मदत न घेता डागडुजीचे काम आरंभले. वरच्या अतिशिकस्त राजेंद्र लॉजचे छत कोसळू नये म्हणून ‘सपोर्ट सिस्टीम उभारली जात होती, मात्र, योग्य मार्गदर्शन व खबरदारी न घेतल्याने संपूर्ण इमारत कोसळल्याचा प्राथमिक निष्कर्ष राजापेठ झोनचे उपअभियंता सुहास चव्हाण यांनी काढला आहे.

यंत्रणा घटनास्थळी

घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या उपायुक्त (प्रशासन) भाग्यश्री बोरेकर, शहर अभियंता इकबाल खान, राजापेठ झोनचे सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, उपअभियंता सुहास चव्हाण, अतिक्रमण अधीक्षक अजय बन्सेले यांच्यासह पालिकेच्या अग्निशमन विभागाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, उपायुक्त विक्रम साळी यांनीदेखील घटनास्थळ गाठले. सहायक पोलीस आयुक्त भारत गायकवाड, कोतवालीच्या ठाणेदार नीलिमा आरज, गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी बघ्यांना आवरून मदत व शोधकार्यात सहकार्य केले.

१४ जुलै रोजी कोसळली होती 'ती' इमारत

१४ जुलै रोजी गांधी चौकातील इमारत कोसळली होती. परंतु, ती इमारत कोसळणार याची जाणीव झाल्याने दुकानातील सर्वच जण बाहेर पडले होते. त्यामुळे जीवितहानी टळली होती. परंतु, रविवारी राजेंद्र लॉजची व्यावसायिक इमारत कोसळून त्याखाली पाच जण गाडले गेले. तेथील पटेल व गावंडे यांचे आसाम टी कंपनी व सोसायटी टी कंपनी तथा शाहिन पेन हाऊस बंद होते. रविवारी फारशी ग्राहकी राहत नसल्याने राजदीप एम्पोरियम हे दुकान सुरू होते. या ठिकाणी व्यवस्थापक रवी परमार तसेच इतर चार कामगार असे पाच जण काम करीत होते. दरम्यान, कोणालाही काही कळण्याच्या आत अचानक इमारत कोसळली व पाचही जण मलब्यात गाडले गेले.

Web Title: Five died, one seriously injured as old building collapses in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.